ताम्रपटावर अनोखी कलाकुसर

ताम्रपटावर अनोखी कलाकुसर

अमित गवळे, पाली

शेकडो वर्षांपासून भारतात ताम्र धातूवर आकर्षक मिनाकारी व शिल्प साकारण्याची परंपरा आहे. काळानुरूप ही कला लोप होण्याच्या मार्गावर असली तरी रायगड जिल्ह्यात अलिबागमधील भायमळा या छोट्याशा गावातील संजय पाटील व त्यांचा मुलगा विक्रांत पाटील या पिता पुत्राने ही प्राचीन कला टिकवून जोपासण्याचे विडा उचलला आहे. त्‍यांच्या कलेला देशविदेशातील नागरिकांकडून दाद मिळाली आहे.
ताम्र धातुवरील कलाकुसरीला इंग्रजीमध्ये कॉपर इनॅमल आर्ट्स अँड क्राफ्ट्‌स असे संबोधले जाते. पनवेल-अलिबाग मुख्य रस्त्यापासून चार किमी अंतरावर असलेल्‍या भायमळात काही वर्षांपूर्वी चार-पाच कलाकार होते. आता विक्रांत व संजय पाटील यांच्या माध्यमातून ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्‍न सुरू असून कॉपर इनॅमल आर्ट्स अँड क्राफ्ट्स या सोशलमीडियाच्या माध्यमातून ते आपल्‍या वस्‍तूंची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतात.
ताम्रपटावर चित्र रेखाटून त्यावर नेत्रदीपक मिनाकारी (वैशिष्ट्यपूर्ण रंग भरणे) कलाकृती निर्माण करणे. तांब्याच्या पत्र्यावर विविध आकार, विविध चित्र, आकर्षक रंगाने रंगवून कलाकृती तयार करण्याची कार्यशाळा संजय व विक्रांत आपल्या घराजवळ चालवीत आहे. हे अतिशय मेहनत, जिद्द, चिकाटी, अनेक तास व दिवस खर्ची टाकून करावयाचे काम असून एकाग्रता आवश्‍यक आहे.
विक्रांतचे वडील संजय पाटील गेली ४७ वर्षे ही कला टिकावी या करिता व्यवसाय करीत आहेत. अनेक चढउतार त्यांनी पाहिले. सध्या तांब्याची वाढलेली किंमत ही एक मोठी समस्या आहे. मुंबईतील काही संस्था व व्यावसायिकांचे सहकार्य लाभत असून तरुण मुले-मुली या अनोख्या कलेत रस घेत आहेत. काही तरुण भायमळा येथे ८-१५ दिवस राहून आपली कलाकृती पूर्ण करतात.

अप्रतिम कलाकृती
ताम्रधातूवर कलाकुसर करण्याच्या कार्यशाळेत २ सेंमी ते १२ फुटांपर्यंत विविध आकाराचे चित्र/शिल्प तयार होते. यात वॉलपीस, दरवाजा, झुंबर, वॉल लॅम्‍प, टेबल लॅम्प अशा विविध कलाकृतींचा समावेश आहे. एका ताम्र चित्र किंवा ताम्र शिल्प साकारण्यासाठी तासन्‌तास तर कधी दिवस खर्ची करावे लागतात.

सर्वोत्तम कलाकृती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला ८ बाय १२ फूट भारताचा नकाशा यामध्ये स्थळ वैशिष्ट्यांसह सर्व राज्य दर्शविणारे शिल्प हे आपल्या आजवरच्या निर्मितीतील उच्चतम शिल्प असल्याचे संजय पाटील आवर्जून सांगितले.

कला टिकविण्यासाठी धडपड
मुघल काळापासून राजवैभव असलेली ही ताम्र पटावरील कलाकुसर टिकावी या करिता तरुण कलाकार विक्रांत संजय पाटील प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्या छंदाला आणि कलेवरील प्रेमाला देशविदेशातून अनेकांनी दाद दिली आहे.


पाली ः तांब्याच्या कलाकृती करताना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com