रायगडमधील जलजीवनची कामे निकृष्ट दर्जाची

रायगडमधील जलजीवनची कामे निकृष्ट दर्जाची

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : जिल्ह्याला जलजीवन मिशन योजनेतून तब्बल १ हजार २०० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र एकाच कंत्राटदाराला ५० ते ६० कोटी रुपयांची कामे देण्यात आल्याने कामाचा दर्जा आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण होत नाहीत. नागरिकांना पाण्यासाठी आणखी किती दिवस वणवण भटकायचे, असा प्रश्‍न उपस्थित करत याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली.
आमदार पाटील यांनी केलेल्या मागणीला जिल्हा नियोजन समितीच्या सर्वपक्षिय सदस्यांनी दुजोरा देत आमदार पाटील यांनी केलेली मागणी रास्त आणि थेट नागरिकांच्या प्रश्नाला हात घालणारी असल्याचे सांगितले. तालुकानिहाय जलजीवन मिशनची किती कामे मंजूर झाली आहेत, किती पूर्ण झाली आणि एकाच ठेकेदाराला किती कामे देण्यात आली आहेत. याबाबतची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आठ दिवसांमध्ये सादर करावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी पार पडली. बैठकीत आमदार पाटील नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमकपणे बोलत होते. जलजीवन मिशनमध्ये केंद्र आणि राज्याचा निधी दिला जातो. प्रत्येकाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात योजनेबाबत नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी समोर आल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार नसेल, तर हे फार गंभीर असल्याचे आमदार पाटील यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिले. कामांची चौकशी करण्याच्या मागणीला सभागृहातील खासदार, आमदार यांनी दुजोरा दिला. त्यानुसार आता तालुकानिहाय या योजनेची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी मागवली आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात याबाबत बैठक बोलावण्यात येणार असल्याचे तसेच योजनेची सर्व माहिती लोकप्रतिनिधी यांना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com