शिंदे गटासह भाजपला मतदार धडा शिकवतील

शिंदे गटासह भाजपला मतदार धडा शिकवतील

पाली, ता. २१ (वार्ताहर)ः ‘अजित पवारांबरोबरच सुनील तटकरेही भाजपसोबत गेले आहेत, त्यामुळे माझा रायगड रत्नागिरी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. शिंदे गटाच्या गद्दारांसोबत भाजपला मतदारच चांगला धडा शिकवतील. पाली बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पहिला मेळावा असल्‍याचे प्रतिपादन ठाकरे गटाचे ज्‍येष्‍ठ नेते व माजी मंत्री अनंत गीते यांनी केले.
पालीतील मराठा समाज सभागृहात रविवारी सुधागड तालुका शिवसैनिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजप अत्‍यंत गलिच्छ राजकारण करीत आहे. शिंदे गटाच्या गद्दारांसोबत भाजपला मतदारच चांगला धड शिकवतील. म्हणून हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकेच्या निवडणुका रद्द केल्या आहेत. इतकेच काय सरकारने विद्यापीठाची सिनेटची निवडणूकही रद्द केली आहे. खरा शिवसैनिक आजही ठाकरे गटासोबत असल्‍याने अपापसातील मतभेद विसरून पक्षवाढीसाठी प्रयत्‍न करण्याचे आवाहन गीते यांनी केले. यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मेळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले, ज्यांना कमवायचे आहे ते नेते पक्ष सोडून गेले आहेत, मात्र सच्चा कार्यकर्ता आजही पक्षासोबत भक्कम उभा आहे. पक्षांतरासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवली जात असली तरी स्वाभिमान जपल्‍याचे त्‍यांनी अभिमानाने सांगितले. तर रायगडात २००९ मध्ये शिवसेनेने अनंत गीते यांच्या रूपाने भगवा फडकवण्याचे काम केले. आता पुन्हा शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येईल, असा विश्‍वास शिवसेना नेते किशोर जैन यांनी व्यक्‍त केला.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णू पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, तालुका प्रमुख दिनेश चिले, तालुका संपर्क प्रमुख विनेश सितापराव, पेण तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक अश्विनी रुईकर, वर्षा सुरावकर, सचिन जवके, आदी उपस्थित होते.

शेकापसोबत मैत्री कायम
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मैत्री घट्ट आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांची व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका शेकाप-शिवसेना एकत्रित लढविणार असल्याची भूमिका अनंत गीते यांनी स्पष्ट केली.

पाली ः मेळाव्यात अनंत गीते यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com