चार टप्प्यात होणार ग्रीनफील्ड महामार्ग

चार टप्प्यात होणार ग्रीनफील्ड महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २१ : रेवस-रेडी सागरी महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग अपूर्णावस्‍थेत असताना, राज्य सरकारने ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावित केला आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ३८८.४५ किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. ‘एमएसआरडीसी’ने महामार्गासाठी विविध पर्यायांचा अभ्यास करून चार टप्प्यातील अंतिम प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाच्या भूसंपादनाही मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ग्रीनफिल्‍ड प्रकल्पाकरिता अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४ मार्च २०२२ रोजी विधिमंडळात यासंदर्भातील घोषणा केली होती. हा महामार्ग आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच या मार्गाची आखणी कोकण किनारपट्टीवरून करण्यात येणार असल्याने प्रवाशांना निसर्गसौंदर्य अनुभवता येईल, असा दावा ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा करताना करण्यात आला होता.


चार टप्प्यांत बांधकाम
पेण (बलवली गाव) ते रायगड-रत्नागिरी : ९५.४० किमी.
रायगड-रत्नागिरी ते गुहागर-चिपळूण : ६९.४९ किमी.
गुहागर-चिपळूण ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग : १२२.८१ किमी.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग ते पत्रादेवी महाराष्ट्र-गोवा सीमा : १००.८४ किमी.
एकूण ३८८.४५ किमी.

या तालुक्यातून महामार्ग जाणार
ग्रीनफिल्‍ड महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सुरू होऊन पुढे अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, इ. तालुक्यातून प्रस्तावित आहे. यासाठी नव्याने जमीन संपादित केली जाणार असून किती हेक्टर जागा संपादित करावी लागेल, याचा आराखडा केला जात आहे.

‘समृद्धी’च्या धर्तीवर निर्मिती
कोकण ग्रीनफिल्‍ड महामार्ग प्रस्तावित झाल्याने दक्षिणेकडील राज्यांतील प्रवास गतिमान होईल. महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्‍याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोईस्कर होईल. त्‍याअनुषंगाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी द्रुतगती महामार्गकरिता दोन्ही सभागृहात निवेदन करून यापूर्वीच घोषणा करण्यात आहे.

कोकणातील मालाची वेगवान वाहतूक
शिवडी ते न्हावा-शेवा पोर्ट जिथे संपतो, त्या रायगड जिल्ह्यातील चिर्ले गावापासून महाराष्ट्र-गोवा सीमेवरील पात्रादेवीपर्यंत सुमारे ३८८.४५ किमीचा हा महामार्ग असेल. त्‍यामुळे पर्यटन विकासाबरोबरच कृषी उद्योगालाही चालना मिळेल. महामार्गामुळे कोकणातील हापूस, काजू, सुपारी, नारळ इत्यादी उत्पादनांसाठी थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.

कोकणातील तिसरा महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी अद्याप संपलेली नाही. ३० वर्षांपूर्वी काम सुरू झालेला रेवस-रेडी सागरी महामार्गही अपूर्णच आहे. सागरी महामार्गासाठीही पर्यटन उद्योग, कोकणातील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळेल, असे सांगितले जात होते. त्‍यासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाले आहेत. सागरी महामार्गाचेच उद्देश घेऊन ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आधीचे दोन महामार्ग अपूर्ण असताना, नव्या महामार्गाची गरज काय, असा प्रश्नही चाकरमान्यांकडून उपस्‍थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com