गुलाल कोण उधळणार, तटकरेंचा की गीते

गुलाल कोण उधळणार, तटकरेंचा की गीते

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : रायगड लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात मुख्य लढत झाली आहे. आतापर्यंत दोघांमध्ये झालेल्या लढतीमध्ये दोघांनाही रायगडच्या मतदारांनी आलटून पालटून संधी दिली आहे. परंतु आता पक्षफुटीनंतर मतदार कुणाला संधी देणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
कोकणातील सर्वात प्रभावी असणारा कुणबी फॅक्टर, मुस्लीम व्होट बॅंक, सहानुभूती, भाजप कार्यकर्त्यांचे बंड, आणि सत्तेचे केंद्रीकरण अशा सर्वच बाबी दोघांसाठी सरस ठरल्‍या आहेत. त्यामुळे रायगडच्या प्रामाणिक मतदारांनी कोणाच्या पारड्यात मतदान केले असेल, याबद्दल फक्त चर्चाच रंगत आहेत.
महायुतीचे पाठबळ असलेल्या सुनील तटकरेंच्या दिमतीला पाच आमदार, सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाची ताकद यामुळे तटकरेंचा एकहाती विजय होईल, असे मानले जात होते; परंतु राजकीय जाणकार मात्र वेगळेच वास्‍तव मांडत आहेत.
रायगड मतदारसंघाचा कानोसा घेतल्यानंतर तटकरेंना प्रत्येक मतासाठी शेवटपर्यंत झगडावे लागल्याचे दिसून आले. त्याच वेळेला प्रचंड सहानुभूती, स्वच्छ प्रतिमा आणि शेतकरी कामगार पक्षाचे पाठबळ असलेल्या अनंत गीतेंच्याही विजयात अनंत काटे असल्याचे दिसत आहेत. आता निवडणुकीचा धुरळा निवळला आहे. प्रचार काळात झालेले आरोप-प्रत्यारोप लोक विसरले आहेत आणि कार्यकर्त्यांच्या अंगातूनही निवडणुकीचे भूत उतरले असल्याने मतदारसंघात गुलाल कोणाचा उधळणार, याची गणिते राजकीय जाणकार मांडत आहेत.

अंतिम टप्प्यात ११ टक्‍के मतदान
मतदानासाठी दिलेली सायंकाळी पाच पर्यंतची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्रात आलेल्या सर्वच मतदारांचे मतदान करून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. पाच वाजेपर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात ५० टक्के मतदान झाले होते; मात्र त्यानंतर ११ टक्के मतदान झाले. ही मते कोणाच्या पारड्यात पडलीत, वेळ संपेपर्यंत मतदानासाठी बाहेर न पडणाऱ्या मतदारांना अखेरच्या क्षणी कोणी घराबाहेर काढले आणि मतदानासाठी प्रवृत्त केले, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

कुणबी समाजाची मते कुणाला?
रायगड मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या जास्त आहे. कुणबी समाजातील अनंत गीते यांना या मताचा फायदा होतो, असे मानले जात असे. परंतु मधल्या काळात सुनील तटकरे यांनीही कुणबी समाजाला आपलेसे करण्याचे प्रयत्न केला. त्यामुळे कुणबी समाजाचे संघटन तटकरेंच्या बाजूने असल्याचे दिसून आले; या समाजाने तटकरेंना मतदान केले की गीतेंना, याचा अंदाज या उमेदवारांनाही बांधणे कठीण असून कुणबी समाजाच्या मतांवर विजयाचे गणित अवलंबून असल्‍याचे बोलले जात आहे.

मुस्लिम व्होट बॅंक
माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे एकेकाळी वर्चस्व असलेल्या रायगड मतदारसंघात जातीपातीचे राजकारण कधीही झाले नव्हते. आताच्या निवडणुकीत ते प्रकर्षाने दिसून आले. भाजपचा अजेंडा मुस्लिम विरोधी आहे, असा प्रचार केल्याने मुस्लिम समाज तटकरेंपासून दुरावल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. वास्तविक, तटकरे कुटुंबीयांचे मुस्लिम समाजाशी घनिष्ठ संबंध आहेत. मुरूड, श्रीवर्धन येथे तटकरे कुटुंबीयांनी विविध विकास कामे केली आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत मुस्‍लिम मतदारांचा निर्णयही महत्त्‍वाचा ठरणार आहे.

जयंत पाटलांचा सक्रिय सहभाग
इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते असले तरी आपणच निवडणूक रिंगणात असल्‍याचे समजून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी, प्रचारात, सभांमध्ये सहभाग नोंदवला. गीतेंना राजकीय अज्ञातवासातून बाहेर काढण्यापासून ते प्रचारासाठी सर्व यंत्रणा जयंत पाटील यांनी पुरवली. शेतकरी कामगार पक्षाची काही ठोस मते या मतदारसंघात आहेत. त्यांची भर पडल्यास गीतेंचा विजय सुकर होईल, असे समजले जाते. तटकरे यांचा पराभव करण्यासाठी त्वेषाने उतरलेल्या जयंत पाटलांचे प्रयत्न किती सफल
झाले आहेत, हे ४ जूनच्या मतमोजणीतूनच समजेल.

सहानुभूती कोणाच्या बाजूने
कोरोनासारख्या महामारीत तटकरे कुटुंबीयांनी झोकून काम केले होते. त्याचदरम्यान आलेल्या निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण रायगड जिल्हा उद्ध्वस्त झाला असताना तटकरे प्रत्येकाचा संसार पुन्हा उभा राहावा यासाठी प्रयत्न करीत होते. आतापर्यंत कधीही न मिळालेली भरीव नुकसानभरपाई निसर्ग चक्रीवादळात मिळाली. वादळ झाल्यानंतर पहिल्या आठवड्यापासून भरपाईची रक्‍कम नुकसानग्रस्‍तांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली होती. याचा लाभ मतदारसंघातील ८० टक्के लोकांना मिळाल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे सहानुभूती तटकरेंना की स्वच्छ प्रतिमेमुळे गीतेंना असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

लोकसभा विजयात विधानसभेची गणिते
लोकसभा निवडणुकीत महायुती की इंडिया आघाडी या दोघांपैकी कोण बाजी मारणार, हे ४ जून रोजीच समजणार आहे; परंतु या विजयात विधानसभेची समीकरणे जुळवली जाणार आहे. मोदी लाट की सहानुभूतीची लाट, याचा अंदाज उमेदवारांना निकालानंतर येईल. त्याचबरोबर कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या आघाडीला मताधिक्य मिळाले आहे, यावरूनही विधानसभा निवडणुकीची गणिते मांडली जाणार आहेत.

विश्वासघात होण्याची शक्यता
आदिती तटकरेंच्या पालकमंत्रीपदाला विरोध करण्यात महाडच्या भरत गोगावलेंचा पुढाकार होता. तीन वेळा आमदार होऊनही मंत्रिपदाने हुलकावणी दिल्‍याने गोगावले विरुद्ध तटकरे यांच्यात नेहमीच वाद होत; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वीचे वाद विसरून भरत गोगावले यांनी तटकरेंसाठी नेटाने काम केले. अशी स्थिती पेण, अलिबाग, दापोली, गुहागर या मतदारसंघात दिसली नाही. त्यामुळे निकालानंतरच खरे चित्र स्‍पष्‍ट होईल.

गीतेंसाठी अनुकूल काय?
*ठाकरे शिवसेनेविषयी सुप्त सहानुभूती
*भाजपविरोधी मुस्लिम समाजाचा कल
*शरद पवार यांना मानणारा मोठा गट
*कुणबी समाजाची पारंपरिक मते
*शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा

तटकरेंना अनुकूल काय ०
*स्वतः खासदार, एकदा मंत्री, पाच आमदार
*संकटसमयी केलेली मदत
*मतदारसंघातील सततचा संपर्क
*भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचा पाठिंबा

विधानसभा निहाय आकडेवारी
मतदारसंघ/ मतदान/टक्केवारी
पेण - १९५६५३/६६.८७
अलिबाग-१९८२८५/६८.३५
श्रीवर्धन-१५५२५४/५९.००
महाड- १६३६९६/५८.७५
दापोली-१६०७९८/५६.२५
गुहागर-१३५८७७/५४.१५
एकूण - १००९५६३/६०.९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com