खरीपाच्‍या क्षेत्रात घट

खरीपाच्‍या क्षेत्रात घट

खरीपाच्‍या क्षेत्रात घट
लहरी हवामानाचा फटका; नाचणी पीक वाढवण्याचे कृषी विभागासमोर आव्हान

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २२ : लहरी हवामान, अवकाळी पाऊस, मजुरांचा अभाव, मेहनतीच्या तुलनेत कमी झालेल्‍या उत्‍पादनामुळे शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. त्‍यामुळे रायगडमधील खरीप हंगामातील क्षेत्र दोन वर्षांत १० हजार ५९१ हेक्टरने घट झाली आहे. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास जिल्ह्याच्या कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. काही दिवसांवर पावसाळा आल्‍याने कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजन केले जात आहे. यंदा रायगड जिल्ह्यात एकूण एक लाख तीन हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणार असून नागली, तूर, उडीद पिकाचे क्षेत्र वाढवण्याचे कृषी विभागाचे प्रयत्न आहेत.
निवडणूक आचारसंहितेमुळे खते, बियाणे यांचे वितरण करण्यात विलंब होत आहे. यासाठी २० मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेली सभाही रद्द करण्यात आली. शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत मिळणे आवश्यक असल्याने यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रायगडमधील ९५ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पावसाचा लहरीपणा वाढत असल्याने शेतीला फटका बसतो आहे. वाढलेले मजुरीचे दर, कमी झालेली उत्पादकता, सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे हैराण झालेले शेतकरी पारंपरिक भात शेतीपासून दूर जात असल्याचेही चित्र जिल्‍ह्यात आहे.
शेतीचे सर्वाधिक घटते प्रमाण पनवेल, उरण, पेण, अलिबाग या नागरिकरण होत असलेल्या तालुक्यांमध्ये आहे. पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामातील नियोजनाकडे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष असते.
यंदा ९८ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रात भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खते, बियाणे आदींची कमतरता जाणवणार नाही, बोगस बियाणांची वाहतूक व विक्री होणार नाही, ई-केवायसी याबाबत कृषी विभागाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. जेवढे खरिपाचे क्षेत्र आहे, त्यापेक्षा जास्त क्षेत्राचा विम्यामध्ये समावेश असू नये, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्‍यक्ष पाहणी करावी लागेल. कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना बांधावर मिळण्यासाठी प्रात्यक्षिकांची संख्या वाढवावी, अशा सूचना कृषी अधिक्षक कार्यालयाकडून केल्या जात आहेत.

हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करा
पाऊस पडेल, या अपेक्षेने शेतकरी पेरणी करतात. मात्र बऱ्याचवेळा पाऊस वेळेवर येत नाही, यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडते. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी व हवामान विभागांच्या सूचनांकडे वेळोवेळी लक्ष देणे आवश्‍यक आहे. पीक लागवडीपूर्वी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरते. अनेकदा पेरणी केल्‍यावर पावसाला विलंब झाल्‍यास शेतकऱ्यांनी बी-बियाणांवर केलेला खर्च वाया जातो. दुबार पेरणीची वेळ येते, अशी परिस्थिती टाळण्यासाठी हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे असते.

अंतर पीक घेण्याचा सल्‍ला
हल्‍ली हवामानाच्या लहरीपणामुळे उत्‍पादनावर परिणाम होत आहे. पाऊस वेळेवर सुरू झाला, तर १५ जुलैपर्यंत खरीप हंगामातील पिके चांगली येतात. नंतर पडणाऱ्या पावसामुळे मात्र पिकांची वाढ खुंटते अथवा अतिवृष्‍टीमुळे पिके कुजण्याची, किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. परिणामी उत्पादनात घट होते अथवा दर्जा खालावतो. यामुळे खरीप हंगामात अंतर पिके घेण्यावर भर देण्याचा सल्‍ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.

खरीप हंगामातील शेती क्षेत्र हेक्‍टरमध्ये
पीक - २०२२ - २०२४
भात - १,०५,२६१ - ९८,९१८
नागली - ७,१२८ - २,८७६
तूर - ९०६ - १,२४९
कडधान्य - १७३ - २००
एकूण क्षेत्र - १,१४, ४४३ - १,०३,८४२

खरिपासाठी प्रशासनाची सज्जता
जिल्ह्यात २४ हजार ६०० मेट्रिक टन इतक्या रासायनिक खतांची आवश्यकता असून त्याप्रमाणे कृषी विभागाकडे मागणी नोंदवण्यात आली आहे. तसेच ३४ हजार ९०० लिटर्स कीटकनाशके व बुरशीनाशकांची आवश्यकता आहे. भाताच्या बियाण्याची आवश्यकता १५ हजार १५५ क्विंटल इतकी आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात येत आहे.

भरारी पथकांची स्थापना
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर दोन तर प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात, यासाठी उत्पादन व साठवणूक स्थळावरील नमुने घेऊन तपासणी करण्याच्या सूचना निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. सदोष नमुने आढळल्यास ते जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

कृषी विषयक माहिती
भौगोलिक क्षेत्र - ६ लाख ८६ हजार ८९२ हेक्टर
निव्वळ पेरणीखालील क्षेत्र - १ लाख १४ हजार ७३४ हेक्टर
खरीप हंगामाचे क्षेत्र - १ लाख ०४ हजार १३२ हेक्टर
रब्बी हंगामाचे क्षेत्र - २१ हजार हेक्टर
फळ पिकाखालील क्षेत्र - २२ हजार २४४ हेक्टर
खातेदार - ३ लाख ११ हजार ६४८
निव्वळ दरडोई उत्पन्न - १,३२,६०७ रुपये

नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर
अलिबाग तालुक्यातील २० हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण उपक्रमातून सरी वरंबा पद्धतीने हळद लागवड केली जाणार आहे, त्याचबरोबर शेततळ्यातील मत्स्योत्पादन प्रकल्पातून ३० शेतकऱ्यांना साह्य केले जाणार आहे. पेण तालुक्यात जेएसडब्ल्यू कंपनीच्या सहकार्याने २० हेक्टर क्षेत्रावर करटुलीची लागवड करण्याचे नियोजन आहे. मुरूड तालुक्यात नारळी-सुपारीच्या बागांमध्ये आंतरपीक म्हणून काळीमिरीचे पीक १० हेक्टर क्षेत्रातील बागायतदारांनी घ्यावे, यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न आहेत.

यंदा एक लाख तीन हजार क्षेत्रावर भातासह विविध पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे. केलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा प्रयत्‍न आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हातात वेळेत बियाणे, खते मिळावीत, त्यातील काळाबाजार कमी व्हावा, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते मिळावीत यासाठी प्रयत्न करणार आहे.
- वंदना शिंदे, कृषी अधिक्षक, जिल्हा अधिकारी कार्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com