तळीये दरडग्रस्तांची परवड सुरूच

तळीये दरडग्रस्तांची परवड सुरूच

तळिये दरडग्रस्तांची परवड सुरूच
तीन वर्षांत केवळ ६६ कुटुंबाना निवारा; पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : तीन वर्षांपूर्वी महाड तालुक्यातील तळिये गावावर दरड कोसळली. या दुर्घटनेत बेघर झालेल्या २७१ पैकी केवळ ६६ कुटुंबीयांना आतापर्यंत घरांचा ताबा देण्यात आला आहे. सध्या गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून कुटुंबांना पिण्याचे पाणी देखील सरकार पुरवू शकलेले नाही, त्‍यामुळे आपले पुनर्वसन केव्हा होणार, असा प्रश्न उर्वरित कुटुंबांना पडला आहे.
नव्याने वसवलेल्या तळिये गावात पाण्याची टाकी बांधण्यात आले, पण टाकीतच पाणी नाही, तर नळाला पाणी कोठून येणार, अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे. सध्या विकतच्या पाण्यावर या दरडग्रस्‍तांना समाधान मानावे लागते. महाड तालुक्यातील तळिये गावावर २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली होती आणि एका क्षणात तळिये गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली नाहीसे झाले. या दुर्घटनेत गावातील ८७ जणांचा बळी गेला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. त्‍यानंतर गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घेतली. म्हा
म्‍हाडाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी भूसंपादन करून सुरुवातीला घरांचे काम वेगात सुरू झाले नंतर मात्र कामाचा वेग मंदावला. झालेल्‍या कामांच्‍या दर्जाबाबत ग्रामस्‍थांनी अनेकदा शंका उपस्थित केल्‍या. तळियेच्‍या सात वाड्यांमधील २७१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्‍याचा निर्णय झाला होता; परंतु तीन वर्षांत रडतखडत केवळ ६६ कुटुंबांना निवारा मिळाला आहे. लोणेरे इथे झालेल्‍या ‘शासन आपल्‍या दारी’ या कार्यक्रमात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या उपस्थितीत घरांच्‍या चाव्‍या दरडग्रस्‍त कुटुंबांना सुपूर्द करण्‍यात आल्‍या. उर्वरित कुटुंबांपैकी काही कंटेनर शेडमध्‍ये तर बरीचशी कुटुंबे अद्यापही गावातच आपल्‍या जुन्‍या घरात राहत आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू
सध्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यातील घरांची कामे संथगतीने सुरू आहेत. २०० हून अधिक घरे उभी करायची असली तरी तेथे कामगारांचा राबता दिसत नाही. मोजक्‍याच कामगारांच्‍या मदतीने हे काम केले जात आहे. हे काम असेच सुरू राहिले तर पुढील दोन वर्षात तरी ही घरे पूर्ण होतील का, अशी शंका दरडग्रस्‍तांकडून व्‍यक्‍त करीत आहेत.

पिण्यासाठी विकतच्या पाण्याचा आधार
पहिल्‍या टप्‍प्‍यातील कामांमध्‍ये गटारांची कामे निकृष्‍ट दर्जाची झाली होती. ती पुन्‍हा करावी लागली. महत्त्‍वाचे म्‍हणजे या वसाहतीत राहण्‍यास आलेल्‍या कुटुंबांना पिण्‍याचे पाणीदेखील सरकार पुरवू शकले नाही. जी नळपाणी योजना राबवली होती, ती पूर्ण झाली नाही. तेथे उंच साठवण टाकी दिसते पण योजनेचे पाणी टाकीत कधी पडलेच नाही. सध्‍या रहिवाशांना टँकरने पाणी पुरवले जाते. परंतु ते पिण्‍यायोग्‍य नसल्‍याने विकतचे पाणी घ्‍यायला लागते, अशी इथल्‍या रहिवाशांची तक्रार आहे.

सहापैकी फक्त एक कोंडाळकर वाडीचे पुनर्वसन झाले. ६६ कुटुंबे आता नवीन वसाहतीत राहताहेत. उर्वरित सहा वाड्यांमधील ग्रामस्‍थ आजही डोंगराच्‍या पायथ्‍याशी राहतात. पावसाळ्यात तेथे आजही दरडींचा धोका कायम आहे. घरे बांधण्याचे काम सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे.
- गणेश माने, ग्रामस्‍थ

तळिये दरडग्रस्‍तांसाठी बांधलेल्‍या घरात काही उणिवा राहिल्या असतील, तर त्या दूर करूनच घरांचा ताबा दरडग्रस्तांना देण्याचा प्रयत्न आहे. अलीकडेच २६ घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून एकूण घरांची संख्या ९२ झाली आहे. नव्याने देण्यात आलेल्या घरांमधील काही सुविधा देणे बाकी असतील तर त्या पूर्ण केल्या जातील.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com