गावपातळीवर पर्यटन समित्‍या स्‍थापन

गावपातळीवर पर्यटन समित्‍या स्‍थापन

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३ : धोकादायक पर्यटन स्‍थळांवर बंदी घातली तरी हौशी पर्यटक चोरवाटेचा अवलंब करतात. गतवर्षी पर्यटन स्थळावर गर्दी होऊ नये म्हणून जमावबंदीचा १४४ कलम लावण्यात आला होता. तसेच पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या मार्गावरही पोलिस तैनात होते, मात्र तरीही काही पर्यटक जीव धोक्‍यात घालून छुप्या मार्गाने धरण, धबधबे गाठतात आणि अतिउत्‍साहात स्‍वतःचा जीव गमावतात. अशा पर्यटकांना रोखण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाकडून स्थानिक तरुणांची मदत घेतली जात आहे. तसेच गावपातळीवर पर्यटन समित्‍याही स्‍थापन करण्यात आल्‍या आहेत. पर्यटन स्‍थळांवर बंदी ऐवजी शिस्‍त हवी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यापेक्षा शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे.
पर्यटन स्‍थळांवर बंदी घालण्यापेक्षा धोक्याच्या ठिकाणी न जाण्यासाठी जनजागृती करण्याकरिता गाव पातळीवर पर्यटन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. यातून पर्यटकांना धोक्याच्या सूचना देणे, त्यांच्यासाठी दिशादर्शन फलक लावून सुरक्षित स्थळी जाण्याचे मार्गदर्शन करणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यात गडकिल्ले, धबधबे, समुद्रकिनारे यांची संख्या मोठी आहे. अशा सर्वच ठिकाणी प्रशासनाला पोलिस बंदोबस्त ठेवणे शक्य नाही, याठिकाणी दुर्घटना घडल्‍यास, बचावकार्य पोहचवण्यात अडचणी येतात. या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वर्षा सहलीदरम्‍यान दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या सहभागाने गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात यावी. या समितीने गावाच्या हद्दीतील पर्यटन स्थळे, तलाव, धबधबे, समुद्रकिनारे अशा जागांवर जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी पर्यटकांना विविध माध्यमांतून सतर्क करावे, असे सूचित केले आहे.

स्थानिकांना गाईडचे प्रशिक्षण
प्रबळगडाच्या धर्तीवर इर्शाळगड, पेब किल्ला, माणिक गड (रसायनी), कोथळी गड (पेठ गड), सागरगडासह वन विभागाच्या हद्दीमधील गड-किल्ल्यावर स्थानिक तरुणांना गाईडचे प्रशिक्षण देणे, पर्यटकांना स्थानिक गार्डड सोबत नेणे बंधनकारक करावे, पर्यटकांना गड-किल्ले, धबधबा, धरणे, पाणी प्रकल्प समुद्रकिनारी व इतर धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यास प्रतिबंध करणे, आदी सुरक्षा यंत्रणा गाव पातळीवर विकसित करण्याचा प्रयत्‍न जिल्हा प्रशासनाचा आहे.

गिर्यारोहकांना सावधगिरीच्या सूचना
जिल्ह्यात गडकिल्ल्यांची संख्या जास्त आहे. पावसाळ्यात गडकिल्ले सर करण्यासाठी काही हौसी गिर्यारोहक हमखास येतात. निसरड्या पायवाटा किंवा पावसामुळे उंच डोंगराचा भाग ढासळत असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. त्‍यामुळे पावसाळ्यात गिर्यारोहण करताना अनुभवी गिर्यारोहकांची मदत घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

स्थानिक तरुणांच्या माध्यमातून पर्यटन स्‍थळांवरील अपघात नियंत्रणासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. यासाठी तरुणांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार असून रोजगाराच्या संधीही उपलब्‍ध होतील. पर्यटकांवर कारवाईपेक्षा सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिकांच्या मदत घेतली जाईल.
- सागर पाठक, अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

गावोगावी नेमण्यात आलेल्या आपदा मित्रांना बचावकार्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, एखादी दुर्घटना घडल्यास सरकारी बचावपथक दाखल होण्यापूर्वी हे आपदा मित्र बचावकार्य राबवू शकतात. इर्शाळवाडी, तळियेसारख्या दुर्घटनांमध्ये गावातील तरुणांनीच जीवितहानी टाळण्यासाठी पुढाकार घेतला होता. देवकुंड येथेही अनेकांचे प्राण स्थानिक तरुणांनीच वाचवले आहेत. कोणत्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता ते काम करीत असतात. जिल्हा प्रशासनाच्या नव्या भूमिकेतून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
- रामदास कळंबे, नरवीर बचाव पथक, पोलादपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com