‘गरूड झेप’ घेण्यास तरुण सज्ज

‘गरूड झेप’ घेण्यास तरुण सज्ज

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : कोकणातील तरुणांचा प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी मिळवण्याच्या फंदात न पडता येथील तरुण रोजगारासाठी मुंबईचा मार्ग निवडतात. हा कल बदलण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींनीही कधी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे जिल्‍ह्यात स्पर्धा परीक्षांसाठी योग्य वातावरणच निर्माण झाले नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून गतवर्षी अलिबाग येथे ‘गरूड झेप’ मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला तरुणांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलिस भरतीमध्ये ‘गरूड झेप’ केंद्रातील तरुण आपले कौशल्य आजमवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रायगड जिल्ह्यातील तरुणांचा विविध स्पर्धा परीक्षांमधील सहभाग नगण्य आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शनाचा अभाव व अभ्यास साहित्याची माहिती नसणे. या अडचणीवर मात करून रायगड जिल्ह्यातील होतकरू तरुणांना प्रशासकीय सेवेच्या संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ‘गरूड झेप’ उपक्रम सुरू करण्यात आला. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात पेणमध्ये ४ डिसेंबर २०२१ मार्गदर्शन केंद्र सुरू झाले. या केंद्राला मिळालेल्‍या प्रतिसादानंतर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग येथेही गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मार्गदर्शन केंद्र, अभ्‍यासिका सुरू करण्यात आली.
अलिबाग नगरपालिकेने बांधलेल्या नव्या इमारतीमध्ये सुरू झालेल्या अभ्‍यास केंद्रामध्ये आजच्या घडीला ३१५ विद्यार्थ्यांनी अधिकृत नोंदणी केली आहे. दोन मजली अभ्यासिकेत साधारण १०० विद्यार्थ्यांची बसण्याची सोय, विविध पुस्तकांचे वाचनालय, वर्तमानपत्र अशा सुविधा उपलब्‍ध आहेत. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत केंद्रात विद्यार्थ्यांचा राबता असतो. यात काही विद्यार्थी नोकरी करणारे आहेत, काहीजणांचे शिक्षण सुरू आहे. आपली नोकरी आणि कॉलेजची वेळा सांभाळून हे विद्यार्थी अभ्‍यासासाठी वेळ काढतात. याठिकाणी मार्गदर्शन शिबिरांचेही आयोजन केले जाते. नगरपालिकेच्या अद्ययावत इमारतीमध्ये आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. अलिबाग शहरापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्‍त आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे
# ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढविणे.
# विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची प्राथमिक तयारी करून घेणे व योग्य दिशा देणे.
# दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवणे.
# रायगड जिल्ह्यातील दर्जेदार व होतकरू तरुणांची गुणवत्ता वाढवणे.
# ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण व्हावे.
# तरुणांना प्रशासनातील वाटा वाढवून मानव संस्थेचा विकास साधने.


‘गरूड झेप’ ची वैशिष्ट्ये
# आठवड्यातून दोन दिवस खुले मार्गदर्शन शिबिर
# प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
# विद्यार्थ्यांना पुस्तके व संदर्भ साहित्याची उपलब्धता
# भरपूर सराव परीक्षांचे नियोजन.
# प्रतिरूप मुलाखतींचे आयोजन.
# ऑनलाईन मार्गदर्शनाची सुविधा निःशुल्क आहे


जिल्ह्यातील अधिकारीच मार्गदर्शक
प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे धडे दिले जात असून निवडलेले मार्गदर्शक हे सध्या प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारीच आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास
अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, पोलिस उपनिरीक्षक, मुख्याधिकारी अशा प्रशासनाच्या वेगवेगळ्या अंगाशी संबंधित असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या केंद्रातून देण्याचे नियोजन आहे. हा प्रयोग पेण येथे यशस्वीपणे करण्यात आला होता. या मार्गदर्शनातून स्पर्धा परीक्षांचा गाभा असलेल्या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी इत्यादी विषयांचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पहिल्या टप्प्यात पेण येथे मध्यवर्ती ठिकाणी ''गरूड झेप'' स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाले आहे. त्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालयात हे केंद्र सुरू केले जाणार होते. यातील अलिबाग तालुक्यासाठी असलेले अभ्यासकेंद्राला तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या हजारहून अधिक विद्यार्थी केंद्राच्या सेवेचा नियमितपणे लाभ घेत आहेत. कौतुकाची बाब म्हणजे लाभ घेणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण निम्यापेक्षा जास्त आहे. ऑनलाइन मार्गदर्शनाबरोबर ऑफलाइन अभ्यासामध्येही त्यांचा सहभाग वाढला आहे.

सर्व तालुक्यांमध्ये केंद्र
विद्यार्थ्यांना घराच्या जवळच अभ्यासाची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी प्रशासकीय स्‍तरावर प्रयत्न सुरू आहेत. पेण, अलिबाग येथे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे. यासाठी पुस्तके, अभ्यास साहित्याचे संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तहसील स्तरावर अशा प्रकारच्या अभ्यास केंद्रांची स्थापना करून विद्यार्थ्यांना विनाशुल्‍क सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. पेण तालुक्यातील अभ्यासिकेप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.

गरुड झेप अॅप
मार्गदर्शन केंद्रात पोहचणे सर्वच विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने ''गरूड झेप'' हे ॲप विकसित केले आहे. सदरील ॲप अँड्रॉइड प्रणालीवर आधारित असून प्लेस्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचाही लाभ ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी घेत आहेत. या अॅपवर स्पर्धा परिक्षांची तयारी करणे विद्यार्थ्यांना सुलभ जाते.

अलिबाग येथील स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. शैक्षणिक सुविधांसह इतर सुविधा पुरवण्याकडे नगरपालिकेचे लक्ष असते. रात्री बारापर्यंत येथे विद्यार्थी थांबतात, परंतु गैरसोयीचे होऊ नये म्हणून दोन शिफ्टमध्ये कर्मचारी काम पाहतात. उष्मा वाढल्‍याने लवकरच याठिकाणी एसी बसवण्यात येणार आहे. केंद्र चालवण्यासाठी येणार खर्च भागावा यासाठी विद्यार्थ्यांची आर्थिकस्थिती लक्षात घेऊन २०० रुपये नाममात्र मासिक फी ठेवण्याचा विचार आहे. मात्र, ती ऐच्छिक असेल.
- अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगरपरिषद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com