छाननीत २२ उमेदवारी अर्ज बाद

छाननीत २२ उमेदवारी अर्ज बाद

Published on

छाननीत २२ उमेदवारी अर्ज बाद
निवडणूक रिंगणात ९४ उमेदवार; बंडखोरांनी वाढवली प्रमुख उमेदवारांची चिंता
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३१ : रायगड जिल्ह्यात होत असलेल्या सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेतून २२ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. बुधवारी (ता. ३०) झालेल्या छाननी प्रक्रियेत सर्वाधिक नऊ अर्ज पनवेल मतदारसंघातील बाद झाले आहेत. शिल्लक राहिलेल्या ९४ वैध उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहे. त्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकूण १११ उमेदवारांनी एकूण १४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यात १७ उमेदवारांनी भरलेले २२ अर्ज बाद झाले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १११ पैकी ९४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. पनवेल मतदारसंघातील ३० पैकी सर्वात जास्त नऊ अर्ज बाद झाले असून २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, तर उरणमध्ये १७ पैकी एकही अर्ज बाद झालेला नाही. अलिबाग मतदारसंघातील २८ पैकी एकच अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद झाला. या मतदारसंघात सर्वात जास्त २२ उमेदवारांचे २७ अर्ज कायम आहेत. यात नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.

बंडखोरांचे अर्ज शाबूत
बंडखोर उमेदवारांचे अर्ज शाबूत राहिल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी मतपरिवर्तन करण्यासाठी प्रमुख उमेदवारांना कष्ट करावे लागत आहेत. सर्वाधिक जास्त बंडखोरी कर्जत मतदारसंघात झाली आहे. येथे भाजपचे किरण ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे या उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे अर्ज छाननीत कायम राहिल्याने प्रमुख उमेदवारांची चिंता वाढली आहे.
अलिबागमध्येही बंडखोरी झाल्याने बंडखोरांची मनधरणी करावी लागत आहे. या बंडखोरीने रायगडच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. मागील निवडणुकीत उरणमध्ये शिवसेनेच्या विरोधात महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विजयात भाजपने ताकद लावली होती. हा फॉर्म्‍युला आताही वापरला जात आहे. कर्जत आणि अलिबाग येथील निवडणूक निकालावर या फॉर्म्‍युल्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

-----
नामसाधर्म्याने विरोधकांची कोंडी
नामसाधर्म्याचे उमेदवार उभे करून विरोधकांची कोंडी करण्याची परंपरा रायगडकरांनी या वेळीही कायम राखली आहे. त्यामुळे नामसाधर्म्याचा फायदा घेऊन मतदारांच्या मनात गोंधळ उडवण्यासाठी प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जाणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन बाळाराम पाटील, तीन प्रशांत ठाकूर नावाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर हे भाजपचे तर मूळचे शेकापचे असलेले बाळाराम पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार आहेत. कर्जत विधानसभा मतदारसंघातून आमदार महेंद्र थोरवे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेला आणखी एक अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. उरण मतदारसंघातून शेकापचे प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मनोहर भोईर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्याशिवाय आणखी एक मनोहर भोईर नावाचा उमेदवार निवडणूक लढवत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात महेंद्र दळवी नावाचे चार, तर दिलीप भोईर नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आमदार महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत.

----
विधानसभा/उमेदवार/अर्ज/छाननीनंतर
पनवेल/२३/१४०/१५
कर्जत/१३/१५/१२
उरण/१६/१७/१६
पेण/१५/१९/१२
अलिबाग/२३/२८/२२
श्रीवर्धन/१३/२०/१२
महाड/८/११/५

एकूण/१११/१४०/९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com