शेती उत्पादन वाढीसाठी फिरता सौर ऊर्जा संच
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आदिवासी भागातील शेतीला बळ देण्यासाठी एक अभिनव उपक्रम रायगड जिल्ह्यात राबवण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत सुमारे ४०० एकर क्षेत्रावर शेती करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना पोर्टेबल सौरपंपचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना मंगळवार (ता. १५) प्रतिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या पोर्टेबल पंपचे हस्तांतर करण्यात आले. यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन जीवनमानात आमूलाग्र बदल होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला.
सुमारे ४० दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रोहा तालुक्यातील किल्ला या गावाला भेट दिली असता, आदिवासी शेतकरी सलग ४०० एकर क्षेत्रावर दोडका, कारली, भेंडी, कलिंगड यांसारख्या निर्यातक्षम भाजीपाला पिकांची शेती करत असल्याचे निदर्शनास आले, मात्र ही शेती डिझेल पंपांच्या माध्यमातून सिंचनाखाली आणली जात होती. ४५ डिझेल पंपांच्या वापरामुळे एका हंगामात सुमारे ६५ लाख रुपयांचा डिझेल खर्च होतो, तर वर्षातील दोन हंगामांमध्ये हा खर्च तब्बल एक कोटी ३० लाख रुपयांपर्यंत जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.
शेती फायदेशीर करण्यासाठी खर्च कमी करण्यासाठी सौरपंप लावण्याचा विचार करण्यात आला, मात्र जमिनीचे मालक वेगळे आणि शेतकरी वेगळे असल्यामुळे पारंपरिक सौरपंप बसवणे शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून ‘पोर्टेबल आणि मुव्हेबल सौरपंप युनिट’ तयार करण्याची संकल्पना मांडण्यात आली. सौरऊर्जा क्षेत्रात काम करणारे अभिजित धर्माधिकारी यांच्या मदतीने सौरऊर्जा युनिटचे डिझाइन करण्यात आला, जो ट्रॅक्टरच्या सहाय्याने एका शेतातून दुसऱ्या शेतात नेला जाऊ शकतो. नुकतीच पोर्टेबल सौरऊर्जा पंपाची यशस्वी चाचणी पार पडली असून, त्यामधून पाच एचपी क्षमतेने पाणी पंपिंग करण्यात येत आहे. लवकरच असे आणखी सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन सुमारे एक कोटी ३० लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. चाचणीप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे, प्रांत ज्ञानेश्वर खुटवल, तहसीलदार किशोर देशमुख, कृषी अधिकारी महादेव करे, मकरंद बरटक्के, शेतकरीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमामुळे केवळ आर्थिक बचतच नव्हे, तर प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर टाळता येणार आहे. सौरऊर्जेचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीस चालना मिळणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील पहिलाच आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणारा आहे. प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामान्य माणसासाठी, खालच्या थरातल्या माणसासाठी काहीतरी नावीन्यपूर्ण करावे’ या दृष्टिकोनातून साकारलेला आहे. या योजनेमुळे आदिवासीबांधवांचे शेती उत्पादन वाढेल.
- किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

