सुधागडमध्ये दुग्धव्यवसायाला नवी चालना

सुधागडमध्ये दुग्धव्यवसायाला नवी चालना
Published on

अमित गवळे, पाली
सुधागड तालुक्‍यातील शेतीला जोड व्यवसाय म्‍हणून अनेक शेतकरी पशुपालनाकडे वळत आहेत. त्‍यामुळे स्थानिक पातळीवर दूध संकलन वाढत आहे. यातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होत आहे.
तालुक्यातील ७० ते ८० दुग्धउत्पादक शेतकरी व व्यावसायिक आहेत. शेतकरी दत्ताराम कोंडे यांनी सांगितले, की दिवसाला ७० लिटर दुधाचे उत्पादन घेत असून खासगी दूध संकलन केंद्राला पाठवतो. तर सखाराम राजिवडे यांच्याकडून रोज १५ लिटर दूध खासगी दूध संकलन केंद्राला दिले जाते. सर्व दुधाची विक्री जागेवरून होत असून भावही चांगला मिळतो, त्यामुळे कष्ट व श्रम वाचतात. अनेक शेतकरी दोन-तीन वर्षांपासून खासगी केंद्रात दूध संकलन करून अर्थार्जन करीत आहेत.
तालुक्यातील झापपासून, नाडसूर, नांदगाव, सिद्धेश्वर, नेणवली आदी अनेक भागांतून दररोज शेकडो लिटर दूध संकलित होते. म्हशीच्या दुधाला ५० रुपये प्रतिलिटर तर गायीच्या दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर भाव मिळतो.

चाऱ्याची लागवड
काही वर्षांपूर्वी जे शेतकरी जमीन विकून गाडी किंवा घर बांधण्याचे स्वप्न पाहत होते, तर आता ते जमीन खरेदी करून चाऱ्याची लागवड करण्याचा विचार करीत आहेत. दररोज ५०० ते ५,००० रुपये कमावणारे तरुण शेतकरी या भागात उद्योजक म्हणून उभे राहत आहेत.

जागतिक दूधदिन
दूध हा मानवी आहाराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दुधाचे पौष्टिक महत्त्व, दुग्धक्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि दुग्धव्यवसायाचे सामाजिक-आर्थिक योगदान जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यासाठी २००१ पासून जागतिक स्तरावर हा दिन साजरा केला जातो.

सुधागड तालुक्यात ७० ते ८०च्या दशकात घरोघरी गायी-म्हशी होत्या. शेतकऱ्यांना आठवड्याला नियमित पैसे मिळत. १९९०नंतर या व्यवसायावर मंदीचे सावट आले. आता तरुण पिढी पुन्हा या व्यवसायाकडे वळत आहे. तालुक्यात जणू काही गोकुळच प्रस्थापित होत आहे, असे वाटते. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना तर मिळते, शिवाय पशुधनही वाढल्‍याचे दिसते. सरकारने व्यावसायिक व शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या काही योजना द्याव्यात.
- हभप महेश पोंगडे महाराज, शेतकरी, वाकणगाव

सहा महिन्यांपासून दूध उत्पादनाला सुरुवात केली आहे. खासगी दूध संकलन केंद्रात दूध पुरवतो. व्यवसाय खूप चांगला होत आहे. स्वयंरोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
- सतीश पवार, दुग्ध उत्पादक, सुधागड

सुधागड, इंदापूर, कोलाड, तळा, व कोलाड परिसरातील इतर शेतकऱ्यांकडून रोज साधारण हजार ते बाराशे लिटर दूध संकलन केले जाते. जवळपास १२५ ते १५० शेतकरी जोडले गेले आहेत. दुधापासून शुद्ध पनीर, तूप तसेच मावा आदी पदार्थ बनवतो. लोणेरे, माणगाव ते रोहा शहरपासून खांबपर्यंत हॉटेल व डेअरीला हे पदार्थ देतो. सध्या भेसळयुक्त पदार्थ बाजारामध्ये आहेत; पण आम्ही नैसर्गिक शुद्ध दुग्धजन्य पदार्थ विकतो. वर्षाला पावणेदोन कोटींचे उत्पन्न आहे.
- प्रमोद कापसे, दूध संकलन व दुग्‍धजन्य पदार्थाचे निर्मिती केंद्र, मुठवली, ता. रोहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com