१५ हजार हेक्‍टर शेतजमीन ओसाड

१५ हजार हेक्‍टर शेतजमीन ओसाड

Published on

यंदा १५ हजार हेक्‍टर शेतजमीन ओसाड

रोपे तयार न झाल्‍याने भात क्षेत्रात घट; अवेळी पावसासह उधाणाचाही फटका

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : लहरी पाऊस आणि भातशेतीकडे कोकणातील शेतकऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे पाच वर्षांपूर्वी साधारण एक लाख चार हजार हेक्टर भातपिकाखाली असलेल्या क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. यंदा हवामानाच्या स्थितीचा अभ्यास करून ८१ हजार ३३५ हेक्टर भातलागवडीचे नियोजन करण्यात आले होते; मात्र लागवडीसाठी रोपेच तयार न झाल्‍याने कमीत कमी १५ हजार हेक्टर शेतजमीन ओसाड राहण्याची शक्‍यता आहे.
पाऊस लवकर सुरू झाल्‍याने शेतकऱ्यांना धूळवाफेवर पेरणी करताच आली नाही. ज्या ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली ती रोपे खूप दिवस पाण्याखाली राहिली. तसेच नुकत्याच आलेल्या उधाणामुळे किनारपट्टीतील पेरणी केलेली रोपे लागवडक्षम राहिली नाहीत. त्‍यामुळे यंदा जिल्ह्यातील ओसाड भातशेतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विविध कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी भातशेतीपासून दूर जात आहेत. त्यामुळे एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या रायगडची ओळख हळूहळू पुसली जात आहे. भातशेती परवडत नसल्याने शेतकरी आंबा, काजू, नारळ, सुपारी इत्यादी फळ लागवडीकडे लक्ष केंद्रित करू लागल्याचे दिसते. कधी मजुरी पडवडत नाही, तर कधी पाऊसच पडला नाही अशी कारणे देणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा रोपेच उगवली नाहीत, असे नवे कारण सापडले आहे. खरिपातील भातशेतीचा कालावधी साधारणपणे १२० ते १४० दिवसांचा असतो. यातील २५ दिवसांत अनेक शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. भात पेरणी, लावणी आणि त्यानंतर रोपांना तग धरण्यासाठी पावसाची आवश्यक असते. त्यानंतर भाताला फुलोरा येताना पावसाची आवश्यकता नसते. या काळात पाऊस झाल्यास तांदूळ भरण्याचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे भात उत्पादनात घट होऊन नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.
सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. खलाटीतील भातशेती पावसाच्या पाण्याने भरली आहे, तर मोठ्या प्रमाणात भात उत्पादन देणाऱ्या खार जमिनीत उधाणाचे पाणी शिरल्‍याने भात रोपांची उगवणच झाली नसल्याचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्पादनात घट होणार
शेतकरी कर्ज काढून भाताचे बियाणे, खते विकत घेतो. भातशेतीवर त्‍याचा वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. मात्र अतिवृष्टीमुळे कोकणातील भातशेती ऐन हंगामात अडचणीत आली आहे. रोप कमी असल्याने घट्ट लागवड करता येणे शक्य नाही. त्यामुळे प्रतिहेक्टरी उत्पादन घटू शकते. यंदा २९९५ किलोग्रॅम प्रतिहेक्टर लक्षांक कृषी विभागाने ठरवला होता; परंतु रोपाची वाढ चांगल्या प्रकारे न झाल्‍याने उत्पादन क्षमता कमी होऊ शकते, असा अंदाज अलिबाग येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत पाटील यांनी वर्तविला आहे.

दुबार पेरणीचा कालावधी सरला
साधारण १४० दिवसांच्या भातपिकासाठी महत्त्वाचे २५ दिवस सरले आहेत. जिल्ह्यातील काही भागांत भातलागवड सुरू असताना ज्या सखल भागात पाणी तुंबून राहिले होते तेथे रोपेच उगवली नाहीत. उगवलेली रोपे खूप दिवस पाण्याखाली राहिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाफ्यांमध्ये जी रोपे शिल्लक आहेत ती पुरेशी नाहीत. खताचा मारा करूनही त्यांची वाढ झालेली नाही. धूळवाफेवर पेरणी न झाल्याने खोलवर गेलेल्या बियाण्यांची रोपे काढताना ती तुटत असल्‍याचे चणेरा येथील दिनेश राऊत यांची सांगितले.


शेतकऱ्यांचे गणित बिघडणार
यंदा लवकर सुरू झालेल्या पावसाची सरासरी १०६ टक्के असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. लावणीची कामे लांबणीवर पडल्यास नीमगरवा, गरवा पीक तयार होण्यास उशीर होईल. पुढील किमान अडीच महिने या पिकाची निगा शेतकऱ्यांना राखावी लागणार आहेत. जास्त मेहनत आणि कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडू शकतो. याचा थेट परिणाम भाताच्या उत्पादनावर होण्याची शक्‍यता आहे.

इतर पिकाकडे लक्ष
जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती न परवडण्यासारखी झाल्याने ते अन्य पिकाकडे लक्ष केंद्रीत करू लागले आहेत. श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी भातशेतीमध्ये नारळ- सुपारीची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात एका बाजूला भाताच्या बियाण्यांना मागणी घटत असताना रोजगार हमी योजनेमधून फळ लागवडीकडे शेतकरी लक्ष केंद्रित करू लागले आहेत. त्याचबरोबर डोंगराळ भागातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू लागवडीचे क्षेत्र वाढवले आहे. या बागांमध्ये अंतरपीक म्हणून मूग, चवळी, नाचणी या पिकांबरोबरच काकडी, भोपळा यांसारखी पिके घेण्यास सुरुवात केली आहे.

ज्या शेतकऱ्यांना धूळवाफे करण्यास संधी मिळाली नाही, त्‍यांना गादी वाफे आणि कोंब काढून पेरण्याचा सल्ला दिला जात आहे. यातून शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी भाताची रोपे तयार केली आहेत. परंतु सुरुवातील पडलेल्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नव्हती. त्यानंतर सातत्याने पाऊस पडल्याने कमी उंचीची रोपे सतत पाण्याखाली राहिली आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.
- डॉ. विजय मोरे, संशोधन उपसंचालक, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
----
भात पिकाखालील क्षेत्र
एकूण लागवड - ९५ हजार ६४५ हेक्टर
पेरणीचे नियोजन - ७८ हजार ७०० हेक्टर
यंदा लागवडीचे नियोजन -८१ हजार ३३५
सरासरी उत्पादकता - २,३४८ किलो प्रति हेक्टर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com