गेटवे-मांडवा फेरीबोट १ सप्टेंबरपासून
गेटवे ते मांडवा फेरीबोट १ सप्टेंबरपासून
तीन महिन्यांच्या बंदीनंतर होणार सुरुवात; गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांना जलवाहतुकीची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ : तीन महिन्यांच्या बंदीनंतर गेटवे ते मांडवा जलवाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गौरी-गणपतीच्या सणासाठी अलिबाग-मुरूडमधील चाकरमान्यांचा हा सर्वात आवडीचा मार्ग असला तरी यंदा गणेश चतुर्थीला येणाऱ्यांना या सेवेचा लाभ घेता येणार नाही; मात्र परतीचा प्रवास फेरीबोटीने सुखरूप करता येणार आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण कमी होऊन फेरीबोट निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा अंदाज जलवाहतूक संस्थांचा आहे.
मॉन्सून सुरू होण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंतची फेरीबोटसेवा बंद होती. मेरिटाइम बोर्डाने १ सप्टेंबरपासून या मार्गावरील फेरीबोट सुरू करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार अजंठा, मालदार, पीएनपी या वाहतूक संस्थांनी आपल्या फेरीबोटी सज्ज ठेवल्या आहेत. मागील वर्षी घारापुरी बेटाकडे जाणाऱ्या एका प्रवासी बोटीला झालेल्या दुर्घटनेनंतर मेरिटाइम बोर्डाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही कडक अटी घालून दिल्या आहेत. त्या अटींची पूर्तता आणि बोटींची दुरुस्ती करूनच यंदा फेरीबोटी चालवण्यास अनुमती देण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा हा सर्वात लोकप्रिय जलवाहतूक मार्ग आहे. या मार्गावर दररोज हजारो पर्यटक आणि स्थानिक नागरिक प्रवास करीत असतात. या सेवेवर अलिबाग, मुरूड तालुक्यातील पर्यटन व्यवसाय अवलंबू असल्याने फेरीबोट केव्हा सुरू होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा असते.
परतीच्या प्रवासासाठी फेरीबोटीचा वापर
यंदा बुधवार (ता. २७) रोजी गणेश चतुर्थीला गणपतीचे आगमण होत आहे. त्यानिमित्ताने येणाऱ्या भक्तांना या फेरीबोटीचा वापर करता येणार नाही. १ सप्टेंबरपासून फेरीबोट सुरू झाल्यानंतर गौरी विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखरूपपणे करता येणार आहे. याचे नियोजन आतापासूनच अनेकजण करू लागले आहेत.
हवामान शांत होण्याची प्रतीक्षा
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आहे. समुद्रदेखील खवळलेला असून, हवामानात पुढील काही दिवसांत बदल होईल, असा अंदाज मच्छीमार व्यक्त करीत आहेत. हवामान विभागानेही त्याचप्रमाणे अंदाज व्यक्त केला असल्याने १ सप्टेंबरपासून जलवाहतूक वेळेत सुरू करण्याचा प्रयत्न फेरीबोट संस्थांचा आहे.
का बंद असते फेरीबोट?
गेवटे ते मांडवा हा जलमार्ग समुद्रातून जातो. मॉन्सून कालावधीत समुद्राला उधाण येत असल्याने उसळणाऱ्या उंच लाटांमुळे प्रवासी फेरीबोटी उलटण्याची शक्यता जात असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साधारणपणे २६ जुनपासून दरवर्षी फेरीबोटसेवा बंद केली जाते; मात्र यादरम्यान आकाराने मोठी असलेली रो-रो बोट सुरू असते. नारळी पौर्णिमेनंतरही अनेकवेळा समुद्र शांत झालेला नसतो. त्यामुळे ही सेवा थेट सप्टेंबरमध्ये सुरू केली जाते, अशी माहिती पीएनपी मेरिटाइम सर्व्हिसेसचे व्यवस्थापक संजय भोपी यांनी दिली.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेरिटाइम बोर्डाने कडक धोरण अवलंबणे गरजेचे आहे. यासाठी फेरीबोटींची दुरुस्ती, बोटीमध्ये पुरेशे लाइफ जॅकेट असणे आवश्यक आहे. यासंदर्भात मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केल्यानंतर यश येत आहे. यात आणखीन आधुनिक सुविधा करणे गरजेचे झाले आहे.
-चंद्रकांत मोकल, अध्यक्ष, जलवाहतूक प्रवासी संघटना
१ सप्टेंबरपासून गेटवे ते मांडवा फेरीबोट सुरू करण्यास मेरिटाइम बोर्डाने अनुमती दिलेली आहे. यादरम्यान, हवामान शांत होणे गरजेचे आहे. जेव्हा समुद्र खवळलेला आणि वाऱ्याचा वेग जास्त असतो, तेव्हा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेवा बंद करावी लागते.
- आशीष मानकर, बंदर निरीक्षक, मांडवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.