नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

नऊ गावांचा मतदानावर बहिष्कार

Published on

पाली, ता. ८ (वार्ताहर)ः वर्षानुवर्षे रखडलेला रस्ता, गावांमध्ये विकासकामाची बोंबाबोंब, कर भरून विकासाच्या नावाने ठेंगा, लोकप्रतिनिधींकडून मतदानानंतर तोंडाला पाने पुसण्याच्या कामांना कंटाळून सुधागड तालुक्यातील नऊ गावांनी मतदानावर बहिष्काराचा निश्चय केला आहे. तसेच स्वखर्चाने पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव, असा सहा किलोमीटरचा रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे.
पाच्छापूर, रामवाडी, असानेवाडी, झेंडेवाडी, पंचशील नगर, दर्यागाव, गौळमाळ, गौळमाळ, ठाकूरवाडी, सोनारवाडी ग्रामस्थांनी वर्षानूवर्षे रखडलेल्या समस्यांना सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. नऊ गाव संघर्ष समितीची स्थापना करताना आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. अनेक वर्षांपासून पाच्छापूर ते पाच्छापूर फाटा सहा किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार यांनी वारंवार रस्ता दुरुस्तीची आश्वासन दिली, मात्र आजतागायत रस्त्याची दुरुस्ती झाली नसल्यामुळे अपघात होत आहेत.
---------------------------------------------
ग्रामस्थांचे आक्षेप
- दुर्गम भागामध्ये असलेल्या या गावांमध्ये मोबाईलला नेटवर्क नाही. परिणामी लोकांना संपर्क साधणे अवघड जाते. त्यामुळे गावकऱ्यांनी लोकवर्गणी काढून घरांमध्ये वायफाय बसवले आहेत. याशिवाय स्वदेस फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच लोकवर्गणी काढून पथदिवे बसवले आहेत.
- शासनाकडे कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःच गावाचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. तसेच कर भरून मूलभूत गरजाच पूर्ण होत नसतील, तर करदेखील का द्यावा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
-------------------------------------
पाच्छापूर गाव परिसर हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा भाग आहे, मात्र येथे खराब रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती अशा विविध समस्या जैसे थे आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजूट दाखवत गावांचा विकास स्वतःच करण्याचे ठरवले आहे.
-जितेंद्र गद्रे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com