धरणी कंपनांमुळे भीतीचे सावट
धरणी कंपनांमुळे भीतीचे सावट
भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडे पाहणीची मागणी
पाली, ता. १६ (वार्ताहर)ः सुधागड तालुक्यातील महागाव, चंदरगाव, कळकराई, भोप्यांचीवाडी, खांडपोली, वाघोशी, देऊळवाडी, कोंडप, कवेळेवाडी आदी डोंगरपट्टीतील गावांमध्ये गेल्या जमिनीला वारंवार हादरे बसत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेत असून, भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने तातडीने पाहणी करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सुधागड तालुक्यातील डोंगरपट्टीतील गावांना सोमवारी (ता. १५) हादरे बसले होते. सततच्या धक्क्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे, मात्र शासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. महत्त्वाचे म्हणजे, पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने आजवर गावांची पाहणी केलेली नाही. त्यामुळे भविष्यात मोठा धोका उद्भवण्याची भीती ग्रामस्थांना सतावत आहे.
------------------------------
प्रशासनाकडून पत्रव्यवहार
जिल्हाधिकारी कार्यालयातून भूगर्भतज्ज्ञांकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. लवकरच पथक पाहणी करेल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार उत्तम कुंभार यांनी केले आहे, पण भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने तातडीने गावांची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थितीचा अहवाल द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
----------------------------------
आंदोलनाचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते भास्कर पार्टे यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार भारत फुलपागरेंसमोर ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर भास्कर पार्टे यांनी भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. आमच्या विभागात हजारो लोक राहतात, त्यांच्या जीवाची काळजी घ्या अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.