टुमदार घराचा स्वप्नभंग

टुमदार घराचा स्वप्नभंग
Published on

टुमदार घराचा स्वप्नभंग
जिल्ह्यात जमीन खरेदीत फसवेगिरी, प्रतिष्ठित अडचणीत
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ ः निसर्गाच्या सान्निध्यात घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. मुंबईपासून जवळच असलेल्या अलिबाग परिसरातील निसर्गाची भुरळ सेलिब्रिटी, व्यावसायिक, क्रिकेटपटूमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र एका रात्रीत लखपती होण्याच्या इच्छेतून संधीसाधूंकडून फसवेगिरीचे प्रकार सुरू असल्याने टुमदार घराचे स्वप्न अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
मुंबईतील मोठे व्यापारी, किक्रेटपटू, सिनेतारकांनी आलिशान बंगले बांधण्यासाठी जमीन खरेदीचा सपाटा लावला आहे. कोरोनानंतरच्या कालावधीत हे प्रकार वाढले असून, रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतचे परिसर आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत, पण अलिबाग तालुक्यातील १४५ तर मुरूड तालुक्यातील १६५ बांधकामेही सीआरझेडमधील बेकायदेशीर बांधकामे असल्याचे उघड झाले आहे. अलिबाग, मांडवा पोलिस ठाण्यात आठवड्याला सरासरी चार प्रकरणे जमिनीच्या संदर्भात असतात. जमिनीवर ताबा मिळवण्यावरून दोन गटांतील हाणामारी, जमिनीच्या हद्दीवरून वाद, हिश्श्यांवरून वाद, वारस नोंद, तर कधी बांधकामावरून वाद यामुळे पोलिस प्रशासनाच्या कामात वाढ झाली आहे, तर तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये चोऱ्या, हत्या गुन्हेगारी घटना कमी आहेत, मात्र मालमत्तासंदर्भातील तक्रारी वाढल्याचे अलिबागचे पोलिस निरिक्षक किशोर साळे यांनी सांगितले.
--------------------------------------------
जाहिरातबाजीची भुरळ
अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांच्या माहितीनुसार मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्ती जमीन घेण्यास तयार आहेत, परंतु गुंठ्यांमध्ये असलेली जागा, एका सातबाऱ्यावर अनेकांची नावे त्यातच हद्दीचा, रहदारी रस्त्याचा वादामुळे चित्रपट, क्रिकेट, उद्योग क्षेत्रातील लोक जमीन खरेदीच्या भानगडीत पडण्यास तयार होत नाहीत, तर दुसरीकडे मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून आकर्षक सवलती देत गृह संकुलांची जाहिरातबाजी केली जाते, पण खरेदीदारांनी खातरजमा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
----
किचकट नियमांचा त्रास
अलिबाग, मुरूड तालुके निसर्गसौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. अशा निसर्गरम्य ठिकाणी घराचे स्वप्न बाळगणारे काही प्रतिष्ठित व्यक्ती येथे जमीन खरेदीसाठी कितीही किंमत देण्यासाठी तयार होतात, परंतु महसूल विभागाचे किचकट नियमांमुळे खरेदी व्यवहार कायदेशीरपणे होत नाही. सीआरक्षेडचे सर्वसामान्यांना सीमारेषा पळवाटा शोधून पैसे कमावण्यासाठी इस्टेट एजंट काहीही करण्यास तयार असतात. याचा फटका लोकांना बसत आहे.
-------------------------
२२ जणांची बांधकामे जमीनदोस्त
पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या बंगल्यावर २०१९ मध्ये कारवाई झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने एकही मोठी कारवाई केलेली नाही. आतापर्यंत सीआरक्षेडमध्ये येणारी २२ बांधकामे तोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आलेले आहे. बंगलेधारकांनी न्यायालयात धाव घेतल्याने १११ बेकायदा बांधकामांवरील कारवाईवर दिवाणी आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती, मात्र त्यानंतर कारवाई थंडावली आहे.
---
सुहाना खान यांना फटका
अभिनेत्री सुहाना शाहरुख खान यांच्या कथित जमीन खरेदीप्रकरणी अलिबागच्या तहसीलदार कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या दोन स्वतंत्र अहवालांमुळे नवा ट्विस्ट आला आहे. दोन्ही अहवालांमधून जमिनीच्या मूळ अटी-शर्तींचा भंग (शर्तभंग) झाल्याचे स्पष्ट दिसत असले, तरी थेट कारवाई करण्याऐवजी दंड भरून जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याची शिफारस केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी अनेक प्रकरणे येथे उघडकीस आली आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीची बदनामी होत असते.
----
नागाव, बागमळा, पाझर, चौल, रेवदंडा-पालव, मांडवे तर्फे बामणगाव परिसरातील ३० वर्षांपूर्वी मोठ्या कंपनीने जागा खरेदी करताना मूळ मालकाचे १९२७ पूर्वीचे ७/१२ व १ ते ५१५१ इतके फेरफार आणि ८अ उतारे गायब केले होते. हा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ज्या कुटुंबीयांच्या नावे जमिनी होत्या ती नावे नाहीशी करण्यात आली. यामुळे गरीब शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे.
- गणेश मयेकर, तक्रारदार
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com