सुधागड किल्ल्यावर विराजमान भोराई देवी

सुधागड किल्ल्यावर विराजमान भोराई देवी

Published on

सुधागड किल्ल्यावर विराजमान भोराई देवी
नवरात्रोत्सवात भाविकांची प्रचंड गर्दी; ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद
पाली, ता. २४ (वार्ताहर) ः सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अश्विन नवरात्रात या देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने गडावर पोहोचतात. घटस्थापनेपासूनच भाविकांची गर्दी सुरू होते आणि अखेरपर्यंत गड परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघतो.
भोराई देवीचे हे प्राचीन मंदिर शतकानुशतकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. पुराणकथेनुसार या देवीची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिला ‘भृगूअंबा, भोरांबा, भोराई’ अशीही नावे आहेत. देवीची मूर्ती साधारण तीन फूट उंच असून, चतुर्भुज रूपातील मूर्ती हातात त्रिशूळ, खड्ग-खेटक आणि आसूड धारण केलेली आहे. मूळ चंडीकेचे स्वरूप असलेली ही मूर्ती अतिशय देखणी असून, तिच्या दर्शनाने भाविकांना अनोखा आध्यात्मिक अनुभव लाभतो.
इतिहासातही या देवीचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. भोर संस्थानातील पंतसचिवांनी मंदिराची पुनर्बांधणी केली होती व त्यांनीच देवीला आपली कुलस्वामिनी म्हणून स्वीकारले. पंतसचिव चिमाजी रघुनाथ उर्फ नानासाहेब यांनी पुत्रप्राप्तीनंतर आश्विन नवरात्र उत्सवाला प्रारंभ केला. त्याकाळी उत्सवाचे आयोजन तालुक्याचे मामलेदार करत असत. आजही श्री भोराई देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सकाळी पूजाअभिषेक, संध्याकाळी आरती आणि रात्री कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांची मालिका चालते. अष्टमीला गडकरी यांना मानाचे नारळ व विडे देण्याची परंपरा आहे, तर नवमीला शिलंगण व पालखी सोहळा भाविकांच्या उत्साहात पार पडतो. हजारो भाविकांना या दिवसांत प्रसादाचे वाटप केले जाते.
..................
दर्शनासह निसर्ग लाभ
सुधागड किल्ल्यावर येणारे भाविक केवळ देवीचे दर्शन घेऊन परतत नाहीत, तर गडाभोवतीच्या निसर्गसंपन्न वातावरणाचा आनंदही घेतात. किल्ल्याच्या परिसरात गर्द झाडी, वाहते धबधबे, स्वच्छ हवा, उंच डोंगररांगा यामुळे पर्यटक भारावून जातात. तसेच किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, बुरूज, प्राचीन अवशेष पाहताना इतिहास जणू डोळ्यासमोर उभा राहतो. त्यामुळे भोराई देवीचे दर्शन, निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वास्तू यांचा त्रिवेणी संगम भाविकांना अविस्मरणीय अनुभव देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com