भेसळखोरांना लगाम
भेसळखोरांना लगाम
जिल्ह्यात सहा प्रशिक्षणार्थी निरीक्षकांची नियुक्ती; पेण येथे विभागीय प्रयोगशाळा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : अन्न आणि औषध प्रशासनाला सणासुदीच्या दिवसांत मिठाईत होणारी भेसळ रोखण्यासाठी अपुऱ्या मनुष्यबळामुळे विविध अडचणी उद्भवत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील रिक्त जागांवर प्रशिक्षणार्थी औषध व अन्न निरीक्षकांच्या नियुक्त्या करताना पेण-रामवाडी येथे कोकण विभागीय प्रयोगशाळादेखील सुरू केली जाणार असल्याने भेसळखोरांच्या चालुगिरीला लगाम लागणार आहे.
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये अन्न भेसळीचे प्रमाण सर्वाधिक आहे. सणासुदीच्या काळात मिठाई बनवण्यासाठी वापरण्यात येणारे अखाद्य रंग आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा वापर वांरवार निदर्शनास आला आहे. अशा प्रकरणात अन्न सुरक्षा विभागाने तत्काळ कारवाई करत भेसळयुक्त मिठाईचे नमुने जप्त केले आहेत, पण प्रयोगशाळेअभावी तपासणीतील दिरंगाईमुळे नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखणे आणि भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात विविध अडचणी उद्भवत आहेत.
-------------------------
भेसळ रोखण्यासाठी आवाहन
भेसळयुक्त मिठाईमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा गैरप्रकारांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अन्न सुरक्षा विभागाने दिला आहे. तसेच मिठाई खरेदी करताना दुकानाचा परवाना, गुणवत्ता आणि पॅकेजिंगवरील बेस्ट बिफोर तारीख तपासावी. संशय आल्यास तत्काळ तक्रार करावी, असे आवाहन केले आहे.
----
भेसळीचे प्रकार
खराब मावा : मिठाईसाठी वापरला जाणारा मावा बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचा किंवा जुना असतो.
कृत्रिम रंग : आकर्षक दिसण्यासाठी मिठाईमध्ये हानिकारक रासायनिक रंगांचा वापर केला जातो.
नकली घटक : कमी किमतीत मिठाई बनवण्यासाठी दूध पावडर, स्टार्च, इतर स्वस्त पदार्थांचा वापर.
कालबाह्य पदार्थ : काहीवेळा मिठाई बनवण्यासाठी कालबाह्य घटकांचा वापर होतो.
------
कारवाईतील अडथळे
निरीक्षकांची कमतरता : रायगड जिल्ह्यात अन्न निरीक्षकांची १२ पदे मंजूर आहेत, यातील दोनच पदे भरलेली होती.
प्रशासकीय दिरंगाई : तक्रार केल्यानंतर दुर्गम भागात अधिकारी पोहोचत नसल्याने तत्काळ कारवाई होत नाही. तपासणी मोहीम राबवणे, मिठाईचे नमुने गोळा करणे, प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठवणे यामध्ये विलंब होतो.
जनजागृतीचा अभाव : मिठाई खराब असली तरी तक्रार कुठे करायची याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण कमी होते.
अतिरिक्त कार्यभार : कमी मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. ज्यामुळे कामाची गुणवत्ता, गतीवर परिणाम.
भेसळीचे वाढते प्रमाण : भेसळयुक्त अन्नपदार्थांची आणि नकली औषधांच्या विक्रीमुळे आरोग्याला धोका.
----
कोकण विभाग सर्वाधिक विकसित होत असलेला विभाग दळणवळणासाठी खूपच कठीण विभाग आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अधिकारीच नाहीत. या स्थितीवर मात करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनामध्ये भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातून रायगड जिल्ह्यात सहा प्रशिक्षणार्थी दाखल झाले आहेत, तर रामवाडी येथे कोकण विभागीय प्रयोगशाळेसाठी जागेची निवड करण्यात आली आहे.
- नितीन मोहिते, सह आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.