१५ वर्षानंतरही निराशेचे ओझे
१५ वर्षांनंतरही निराशेचे ओझे
पेण अर्बनच्या ठेवीदारांची उपेक्षा, कृती समितीच्या दिरंगाईचा फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २५ ः पेण अर्बंन बॅंक घोटाळा २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता. बॅंकेतील ६०० हून अधिक खातेदारांचा मृत्यू झाला आहे. तर अपहारित ५९८.७२ कोटी रकमेपैकी फक्त सहा कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे १५ वर्षांच्या कालावधीत एक लाख ९८ हजार खातेदार न्याय मिळेल, या अपेक्षेने निराशेच्या ओझ्याखालीच जगत आहेत.
आयुष्यभर जमवलेली पुंजी बॅंकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बोगस कर्जांद्वारे हडप केली. या कर्जाच्या रकमेतून करोडोंची मालमत्ता जमवली असून ही मालमत्ता लिलावात काढून सर्वसामान्य ठेवीदारांच्या रक्कम परत करणे सहज शक्य आहे; मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी नेमलेल्या विशेष कृती समितीकडून दिरंगाई केली जात आहे. विशेष कृती समितीचे चार अध्यक्ष बदलून गेले, तीन सरकारे येऊन गेली, तरी ठेवीदारांना पैसे परत मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे, उपोषणे करावी लागली आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नेमलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समितीच्या बैठका नियमित होत नसल्याची तक्रार आहे. या संदर्भातील लेखी तक्रार पेण अर्बंन बॅक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे अध्यक्ष नरेन जाधव यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे.
--------------------------
प्रशासनावरील मुख्य आक्षेप
- बोगस कर्जदारांवरील कारवाईसंबंधीची चर्चा टाळून जप्त जमिनीची विक्री, अल्प उपलब्ध ठेवींचे वाटप अशा अप्रस्तुत व असंबद्ध विषयांवर चर्चा केली जाते, ठेवीदार याबाबत जाणीव करून देण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांची हेटाळणी केली जाते.
- पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने ७५८ कोटींचा आर्थिक महाघोटाळा शिवाय मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन यांचेही ४८० कोटी रुपये असे एकूण एक हजार २३८ कोटी रुपये बुडविले. यातील बहुतांश ठेवीदार ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे झालेले आहेत. पंधरा वर्षांत सरकारदरबारी हेलपाटे मारल्यानंतर आता ठेवीदारांचा अंत पाहणार का, असा प्रश्न राज्य शासनाला विचारला आहे.
----
आयुष्यभराची पुंजी गमावली
दहा हजार तसेच २५ हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांनाही पैसे परत मिळाले आहेत; पण ही टक्केवारी केवळ १० टक्केच आहे; मात्र त्यानंतर एक लाखापर्यंत ठेवीदारांना पैसे मिळवून देण्याचे आश्वासन चार वर्षे धूळखात पडले आहे. ८० टक्के ठेवीदारांचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ग्राहक सनदशीर मार्गाने आंदोलन करीत असताना विशेष कृती समिती उदासीनता दाखवत आहे. बॅंकेने परतफेड केलेल्या रकमा लहान ठेवीदारांच्या आहेत; परंतु निवृत्तीची रक्कम, मुलांच्या लग्नकार्यासाठीच्या रकमा मिळालेल्या नाहीत.
-----------------------------
घोटाळ्याची रक्कम : अंदाजे ७५८ कोटी
बनावट कर्जवाटप : ११९ लोकांना ७३४ कोटींचे वाटप
ठेवीदारांची संख्या : अंदाजे एक लाख ९८ हजार
बुडालेल्या ठेवी : ६३२.५० कोटी
ठेवीदारांना मिळालेली रक्कम ः ६५ कोटी
----
शासनाने पेण अर्बन बॅंक ठेवीदारांची थट्टा चालवली आहे. ठेवीदारांच्या प्रयत्नानंतर प्रकरणाचा तपास जलद लागला, आरोपींनी बॅंकेच्या पैशांतून कोणत्या मालमत्ता विकत घेतल्या उघड झाले आहे. त्यांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत देणे शक्य आहे; पण विशेष कृती समितीच्या कामकाजातील दिरंगाई निराशाजनक आहे.
- नरेन जाधव, अध्यक्ष, पेण अर्बंन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समिती