आदिवासी महिलांचा पारंपरिक दांडिया

आदिवासी महिलांचा पारंपरिक दांडिया

Published on

आदिवासी महिलांचा पारंपरिक दांडिया
नवरात्रोत्‍सवानिमित्त नऊ दिवस समृद्ध संस्कृतीचे दर्शन
पाली, ता. २५ (वार्ताहर) : नवरात्रोत्सव म्हटला की देशभरात भव्य दांडिया-गरबा खेळले जातात, मात्र रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजात साजरा होणारा दांडिया हा त्याच्या आगळ्यावेगळ्या परंपरेमुळे विशेष आकर्षण ठरतो. या दांडियामध्ये आदिवासी महिलांचा पारंपरिक पोशाख, देवीभक्तीचे गीत आणि निसर्गाशी असलेले नाते याचे दर्शन घडते.
डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या रायगडमधील पाड्यांवर नवरात्र सुरू होताच महिला एकत्र येतात. गटागटांनी त्या गावोगावी, घरांच्या अंगणात किंवा अगदी दुकानदारांच्या आवारातही पारंपरिक गाणी म्हणत दांडिया खेळतात. या नृत्यात ताल, सूर आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम दिसून येतो. वैशिष्ट्य म्हणजे एका महिलेच्या डोक्यावर नैसर्गिक घट ठेवला जातो आणि तिच्या भोवती इतर महिला फेर धरून टिपऱ्या वाजवत नृत्य करतात. या अनोख्या दांडियामुळे नवरात्रोत्सवाला एक वेगळी सांस्कृतिक ओळख मिळते.
.............
पोस्त देण्याची अनोखी पद्धत
या दांडियाला पाहण्यासाठी जमलेल्या लोकांकडून महिलांना पोस्त दिले जाते. पूर्वी हे पोस्त धान्य, नारळ किंवा तांदळाच्या स्वरूपात असायचे; आता त्याजागी रोख रकमेचे प्रचलन वाढले आहे. या प्रथेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांनी कधीही जबरदस्ती न करता लोकांच्या स्वखुशीने दिलेले जे काही असेल तेवढेच आनंदाने स्वीकारले जाते. त्यामुळे या प्रथेतील आदर आणि सौहार्द आजही अबाधित आहे.
............
परंपरेचं जतन – नवीन पिढीचा सहभाग
गेल्या अनेक पिढ्यांपासून नवरात्रीला ही प्रथा अखंड सुरू आहे. काही काळ बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढी या परंपरेपासून दुरावत होती, मात्र अलीकडच्या काळात तरुण-तरुणी उत्साहाने यात सहभागी होत असल्याने सांस्कृतिक वारसा जतन करण्याची प्रक्रिया अधिक बळकट होत आहे.
...........
शक्ती, समृद्धी आणि सृष्टीचं प्रतीक
आदिवासी संस्कृतीत नवरात्रीतील घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. येथे घट म्हणजे केवळ मातीचे भांडे नव्हे, तर शक्ती, समृद्धी आणि सृष्टीचे प्रतीक मानले जाते. पळसाच्या पानांची पत्रावळ, शेतातील शुद्ध माती, सात प्रकारचे धान्य आणि माळरानावर फुलणारी पुरी, या घटकांनी सजवलेला घट त्यांच्या जीवनशैलीशी निसर्गसंगती दाखवतो. नऊ दिवस या घटाची पूजा करून उगवणाऱ्या धान्याच्या अंकुरांतून भविष्यातील पिकाची समृद्धी आणि देवीचा आशीर्वाद घेतला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com