हरवलेल्या बॅगेचा अवघ्या चार तासामध्ये तपास
हरवलेल्या बॅगेचा अवघ्या चार तासांमध्ये तपास
पाली पोलिसांची कार्यतत्परता; चार लाख रुपयांसह महत्त्वाचे चेक मालकाला सुपूर्द
पाली, ता. २५ (वार्ताहर) ः मुंबईचे रहिवासी प्रमोद गणपत देऊळकर यांना पोलिसांच्या कार्यतत्परतेचा सुखद अनुभव आला. बुधवारी (ता. २४) त्यांची जमीन खरेदीसाठी आणलेली चार लाख रुपये रोख रक्कम आणि बँकेचे महत्त्वाचे चेक असलेली बॅग हरवली होती, मात्र पाली पोलिसांनी ती अवघ्या अर्ध्या तासात शोधून काढत प्रमोद देऊळकर यांना परत केली.
प्रमोद देऊळकर यांनी पाली येथील जांभूळपाडा येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी लागणारी चार लाख रुपये रोख रक्कम आणि कॅनरा बँकेचे सही केलेले तीन कोरे चेक त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले होते. बुधवारी (ता. २४) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास देऊळकर पाली येथील विठ्ठल मंदिर परिसरातून जात असताना त्यांची ही बॅग हरवली. तातडीने त्यांनी पाली पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून बॅग शोधून काढली. दरम्यान, प्रमोद देऊळकर यांना पोलिस ठाण्यात बोलावून पाली पोलिस निरीक्षक हेमलता शेरेकर यांच्या हस्ते त्यांची बॅग, रोख रक्कम आणि महत्त्वाचे चेक परत केले. पोलिसांनी केलेल्या या जलद कार्यवाहीमुळे आणि मदत करणाऱ्या प्रामाणिक व्यक्तीमुळे देऊळकर यांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस पथकाने अवघ्या अर्ध्या तासात ही बॅग शोधून काढल्यामुळे त्यांच्या कामाची प्रशंसा केली जात आहे.
...............
पोलिसांची शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक अनिल गोसावी आणि पोलिस शिपाई गौरव भापकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी देऊळकर यांच्यासोबत ज्या ठिकाणी बॅग हरवली होती; त्या परिसराची पाहणी केली. दुकानदारांशी आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांशी चौकशी केली असता एका व्यक्तीने ती बॅग उचलून नेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा फोन नंबर मिळवला. त्या व्यक्तीला संपर्क साधून विचारपूस केली असता, त्याने प्रामाणिकपणे बॅग सापडल्याचे सांगून ती पोलिसांकडे जमा केली. दरम्यान, तपासणी केली असता बॅगेत देऊळकर यांचे चार लाख रोख रक्कम आणि तिन्ही चेक सुरक्षित असल्याचे आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.