महसूल विभागाचा सेवा पंधरवडा उत्साहात

महसूल विभागाचा सेवा पंधरवडा उत्साहात

Published on

महसूल विभागाचा सेवा पंधरवडा उत्साहात
सुधागड तालुक्यात सामाजिक योजनांचा नागरिकांना थेट लाभ
पाली, ता. २ (वार्ताहर) : शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागामार्फत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेला ‘सेवा पंधरवडा’ सुधागड तालुक्यात उत्साहात पार पडला.
या उपक्रमातून रस्त्यांना कायदेशीर मान्यता, जन्म दाखले वितरण, आरोग्य विमा लाभ, निवृत्तिवेतन पडताळणी अशा विविध सेवा नागरिकांच्या दारात पोहोचल्या. तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकारामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न ठरता लोकाभिमुख ठरल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत महसूल अधिकाऱ्यांनी माजी सैनिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तहसील कार्यालय व आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून ४२८ नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड वाटप झाले. या योजनेमुळे प्रत्येकी कुटुंबाला वर्षाकाठी पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळणार आहे.
.................
पहिला टप्पा : रस्त्यांना कायदेशीर मान्यता
१७ ते २२ सप्टेंबरदरम्यान ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’ राबविण्यात आली. राबगाव, तिवरे, आतोणे व माणगाव खुर्द ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांसह महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी संयुक्त फेऱ्या काढल्या. या मोहिमेत आधीपासून नकाशावर असलेले ३ रस्ते आणि नव्याने निश्चित झालेले ३८ शेतरस्ते, पाणंद व वहिवाटीचे रस्ते नोंदविण्यात आले. एकूण ४१ रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
..............
बेघरांना घरे
२३ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेशी संलग्न सर्वेक्षण करण्यात आले. पाली नगर पंचायत क्षेत्रातील टेंभी वसाहतीतील ४६ अतिक्रमणांपैकी २० पात्र ठरले, तर महागाव येथील गुरचरन जमिनीवरील ३७ अतिक्रमणे पात्र ठरली. या नागरिकांना निवासी जमिनींचे पट्टे देण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला आहे. लवकरच वाटपाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
...............
नावीन्यपूर्ण उपक्रम
२८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्थानिक गरजांनुसार विशेष उपक्रम राबविण्यात आले. कातकरी व वंचित घटकातील ४८ विद्यार्थ्यांना जन्म दाखला देण्यात आला, ज्यामुळे त्यांना आधार कार्ड व शैक्षणिक कागदपत्रांचा मार्ग मोकळा झाला. तालुक्यातील १,५७४ लाभार्थ्यांच्या सामाजिक निवृत्तिवेतन योजनेची पडताळणी झाली, त्यातील २७६ जणांची पडताळणी महसूल अधिकाऱ्यांनी घरपोच जाऊन पूर्ण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com