बनावट नोटांचे व्यापारी मोकाट

बनावट नोटांचे व्यापारी मोकाट

Published on

बनावट नोटांचे व्यापारी मोकाट
रायगड जिल्ह्यात चलनात असल्याचा संशय, सावधगिरीचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ८ : रायगड जिल्ह्यात १५ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत, तर चार आरोपींना अटक झाली आहे, पण या प्रकरणात आणखी काही आरोपींच्या सहभागाची शक्यता असल्याने आर्थिक व्यवहारांमधून अशा नोटा चलनात येण्याचा धोका वाढला आहे.
श्रीवर्धन, तळा, म्हसळा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बनावट नोटा आढळून येत आहेत. या नोटा कोणत्या मार्गाने येत आहेत, याचा तपास घेतल्यानंतर गोरेगाव पोलिसांना बनावट नोटांचा सुगावा लागला होता. गोरेगाव पोलिसांनी तीन आरोपींकडून तीन लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर अलिबाग येथील मयेकर आळीमध्ये टाकलेल्या छाप्यात १२ लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व प्रकरणाची व्याप्ती पाहून जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोपींनी १०, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा प्रिंटरद्वारे छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केला होता. काही नोटा चलनात आणण्यात आरोपींना यश आलेले आहे. यामुळे दिवाळी सणाच्या तोंडावर ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक वाढली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मासळी बाजार, भाजीविक्रेत्या महिलांना नोटांची पारख करता येत नाही. त्यामुळे बनावट नोटा बाळगणारे अशा महिलांना लक्ष्य करत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.
----
घाईगर्दीत नोटा वटवण्याचे प्रयत्न
चलनात असलेल्या बनावट नोटांचे पडसाद दिवाळी खरेदीदरम्यान दिसू लागले आहेत. दुकानदार, ग्राहकांना आपापसातील व्यवहारादरम्यान नोटा तपासून घ्याव्या लागत आहेत. रात्रीच्या दरम्यान नोटा पारखणे कठीण जाते. भाजी मार्केट, आठवडा बाजारात घाईगर्दीमध्ये दुकानदार आणि ग्राहकांनाही नोटा तपासून घेताना अडचणी येतात. आकडेवारीनुसार बनावट चलन प्रणालीत आल्यास महागाई वाढण्यापासून देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करण्याला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे त्याचे पडसाद सध्या रायगड जिल्ह्यातही दिसून येत आहेत.
----------------------------
अशी ओळखा बनावटगिरी
कोणतीही संशयास्पद नोट आढळल्यास ती चलनात आणू नका. त्वरित बँकेचे अधिकारी किंवा पोलिसांना कळवा. बनावट नोटा बाळगणे हा एक फौजदारी गुन्हा आहे. नोटांवरील वॉटरमार्क, सुरक्षा धागा, महात्मा गांधींचे अदृश्य चित्र आणि उभट छपाई अशी सुरक्षा वैशिष्ट्ये असतात, तर बनावट नोटांची छपाई, कागद कमी दर्जाचा असल्याने ओळखणे सोपे जाते.
------------------------
होणारे परिणाम :
चलनाचे मूल्य कमी होणे ः बनावट नोटांच्या वापरामुळे महागाई वाढते. मोठ्या प्रमाणात नकली चलन बाजारात येते, तेव्हा अर्थव्यवस्थेतील एकूण पैशाचा पुरवठा अनधिकृतपणे वाढवते, परंतु या बनावट पैशाच्या बदल्यात कोणतीही वस्तू किंवा सेवा तयार झालेली नसते.

बँकिंग प्रणालीला फटका
बनावट नोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे लोकांचा चलन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतो. एखादी नोट खरी आहे की खोटी, हे ओळखणे सामान्य नागरिकांसाठी कठीण होते. यामुळे लोक रोखीचे व्यवहार टाळून इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देऊ लागतात.

थेट नुकसान
बनावट नोटांचा फटका थेट सामान्य नागरिक आणि लहान व्यवसायांना बसतो. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा व्यापारी नकळत बनावट नोट स्वीकारतो, तेव्हा त्याला ते थेट आर्थिक नुकसान होते. कारण, बनावट नोटा आढळल्यास परतफेड मिळत नाही. छोटे व्यापारी, ग्राहकांवर त्याचा बोजा पडतो.
----
बनावट नोटा ओळखणे सोपे आहे. आरोपींकडून काही नोटा चलनात आणण्यात आलेल्या असून, त्या वापरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना अशा प्रकारच्या बनावट नोटा आढळून येतील. त्यांनी पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा.
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक-रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com