एेतिहासिक वारसाला धक्का
ऐतिहासिक वारशाला धक्का 
आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभीकरण वादात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ३० :  येथील दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरण केले जात आहे. समाधी स्थळाच्या संरक्षक भिंतीसाठी फायबरचा वापर केला जाणार आहे, पण यामुळे शेकडो वर्षांच्या ऐतिहासिक वारशाला धक्का लागला असून, पुरातत्त्व विभागाने हरकत घेतली आहे. चुकीच्या पद्धतीने हे काम होत असल्याचे २०२३ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ते थांबवण्यात आले होते. तरीही हे काम पुरातत्त्व विभागाची परवानगी न घेताच पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
चारशे वर्षांपूर्वी सरखेल कान्होजी आंग्रे यांची मुख्य समाधी आणि आंग्रे कुटुंबीयांमधील व्यक्तींची समाधी परिसरात सुस्थितीत आहेत. अलिबागमध्ये येणारे पर्यटक येथे भेट देतात. आंग्रे जयंतीनिमित्ताने होणारे विविध कार्यक्रम नेहमीच ऐतिहासिक आठवणींना उजाळा देतात. शहराच्या मध्य भागातील समाधी स्थळ अलिबागकरांसाठी अभिमानाचे केंद्र आहे. या भागाचा विकास करून सरखेल आंग्रेंचा इतिहास दर्शविणारा लेझर शो, राजे सरखेल आंग्रे यांच्याबद्दलचे ऐतिहासिक दस्तऐवज संग्रहालय, ऐतिहासिक चित्रफितीवर खर्च करण्याची मागणी नागरिक करत आहेत, पण अलिबाग नगरपालिकेने मात्र सुस्थितीत असलेल्या संरक्षण भिंतीवर खर्च करण्याचा घाट घातला आहे. फायबरच्या संरक्षण भिंतीबरोबरच येथे फायबर आणि पीओपीपासून तयार केलेली शिल्प खराब झाली आहेत, तर लोखंडी सांगाडे गंजू लागले आहेत. त्यामुळे सुशोभीकरणाची कामे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
----
नोंदवलेले आक्षेप
अलिबाग येथील दर्यासारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर सुशोभीकरणासाठी शासनाच्या विविध विभागाकडून पाच कोटी सात लाख २५ हजार निधी प्राप्त झाला होता. अलिबाग नगर परिषद यांनी २८ ऑगस्ट २०२३ च्या स्थानिक वर्तमानपत्रात अनुक्रमे रू.२,५२,८६,९६२, रू. १,२७,१९,०३९ व  रू. १,२७,१९,०३९ असे तीन भाग करून तीन निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. शासनाच्या निकषानुसार एकाच कामाची गुणवत्ता ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थीतीमध्ये एका कामाचे तुकडे करण्यावर बंदी आहे. 
---------------------
संरक्षक भिंत सुस्थितीत
संरक्षक भिंतीसाठी पाच कोटी खर्च करण्यापेक्षा राजे सरखेल आंग्रेंचा इतिहास दर्शविणारा लेझर शो, ऐतिहासिक दस्तऐवज संग्रहालय, ऐतिहासिक चित्रफिती यासारख्या आवश्यक बाबींवर खर्च करण्याची मागणी, या समाधीला दगडी संरक्षक बांधले असून, ते सुस्थितीत असल्याचे दिसून आले.  रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने या समाधीच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबबदारी स्वीकारली असल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. असे असताना पुन्हा संरक्षक भिंतीच्या कामासाठी पाच कोटींच्यावर निधी खर्च केवळ कंत्राटदारांसाठी केला जात आहे.  
--------------------------
कोन्होजी आंग्रे यांची चारशे वर्षांपूर्वीची समाधी चांगल्या स्थितीत आहे, परंतु कंत्राटदाराने केलेले सुशोभीकरणाचे काम तकलादू आहे. लोखंडी सांगाड्यावर फायबरच्या शिट लावून दगडी बांधकामांचा दिखावा केला जात आहे. स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व बाधित झाले आहे. 
- संजय सावंत, सामाजिक कार्यकर्ते  
----
आंग्रे समाधी स्थळाच्या सुशोभीकरणासाठी कोणतीही परवानगी पुरातत्त्व विभागाने दिलेली नाही. आंग्रे समाधी स्थळासारख्या ऐतिहासिक स्थळाचे विद्रूपीकरण होत असेल, तर बांधकाम लगेचच थांबवावे लागेल.  
- डॉ. विलास वाहने, उपसंचालक, पुरातत्त्व विभाग
----
जसा निधी येत आहे, त्यानुसार हे काम केले जात आहे. हे काम पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू झालेली आहे. सुशोभीकरणाच्या आराखड्यानुसार येथे एक फायबरची बोट तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर काही फायबरपासून शिल्प तयार केले जाणार आहेत.
- सागर साळुंखे, मुध्याधिकारी, नगर परिषद, अलिबाग

