अन्नासाठी दाहीदिशा भटकंती

अन्नासाठी दाहीदिशा भटकंती

Published on

अन्नासाठी दाही दिशा भटकंती
परतीच्या पावसाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका
पाली, ता. १ (वार्ताहर)ः बदललेत्या ऋतुमानाचा अनेक पक्ष्यांच्या जीवनचक्रावर दुष्परिणाम झाला आहे. अशातच परतीच्या पावसाने स्थलांतरित पक्ष्यांना घरटे बांधण्यास बाधा आणली आहे. तसेच पावसामुळे पक्ष्यांचे अन्नाचे स्रोत कमी झाले असल्याने दाही दिशा फिरावे लागत आहे. त्यामुळे हिवाळ्यात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोडावल्याची माहिती पक्षी अभ्यासकांनी दिली आहे.
दोन-तीन दशकांपासून निसर्गामध्ये अपरिमित असे बदल होत आहेत. प्रत्येक ऋतू हा बदलत चालला आहे. रायगड जिल्ह्यात मेपासून सुरू झालेला पाऊस नोव्हेंबर उजाडला तरी सुरूच आहे. हवामानात प्रचंड दमटपणा, ओलावा आहे. नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होते. थंडीसाठी पोषक वातावरण बनते. परिणामी उत्तरेकडील बर्फाळ प्रदेशातील स्थलांतरित पक्षी उदरनिर्वाहासाठी पश्चिम भारत किंवा दक्षिण भारतात हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल होतात. रायगड जिल्ह्यात काही पक्षी दाखल होतात. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात गवत असल्याकारणाने कीटक, फुलपाखरे, सरपटणारे जीव गवताच्या आणि झाडांच्या पानांच्या सान्निध्यात राहतात. परंतु, सतत पडणाऱ्या पावसाने जीवनचक्रात अनियमित बदल घडले आहेत.
----------------------------------
घरटे बांधणीत अडचणी
- घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांची घरटी वादळी पावसामुळे खाली कोसळली, तर काही घरटी अपूर्ण राहिली आहेत. दयाळ, क्षमा, तुरेवाली पाकोळी, मैना, तांबट, बुलबुल, ब्राह्मणी, साधी घार पक्ष्याच्या घरट्यांचा समावेश आहे.
- पाकोळी पक्ष्याची अंडी हलकी असतात. वाऱ्यामुळे पाकोळी पक्ष्याची अंडीदेखील उडून गेली आहेत. घुबड किंवा इतर पक्षी डोलीमध्ये घरटे करतात. घरट्यांची वाताहत झाली असली तरी अनेक पक्षी पुन्हा नव्या उमेदीने घरटे सावरण्यास सुरुवात करतात. पाऊस स्थिर झाल्यावर पक्षी घरटे पुन्हा बांधतात.
----------------------------------
दख्खनकडे स्थलांतरित
परतीचा पाऊस सतत सुरू राहिला तर अनेक पक्षी दख्खनकडे म्हणजे पुण्याकडे स्थलांतरित होतात. या स्थलांतरामध्ये त्यांची परवड होते, पण चांगल्या निवाऱ्यासाठी हवामानाची आवश्यकता असते.
-------------------------------
परतीच्या पावसामुळे स्थलांतरित पक्ष्यांना निवारा शोधणे कठीण जाते. पावसात भिजल्याने अनेक पक्षी आजारी किंवा मरण पावतात. तर ढगाळ वातावरणामुळे पक्ष्यांची उपासमार होते. अनेक आजारी पक्षी मृत्युमुखी पडतात.
- शंतनू कुवेसकर, पक्षी अभ्यासक, माणगाव

Marathi News Esakal
www.esakal.com