रास्तभाव दुकानातील धान्य निकृष्ट

रास्तभाव दुकानातील धान्य निकृष्ट

Published on

रास्तभाव दुकानातील धान्य निकृष्ट
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; अळ्या, उंदीर-पालीच्या विष्ठा
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः शासनाच्या अन्न सुरक्षा योजना अंतर्गत रास्तभाव दुकानांतून मिळणाऱ्या धान्यावर गरीब, आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिक आपले पोट भरते. मात्र हेच धान्य आता त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील कुंभारघर येथील रास्तभाव धान्य दुकानातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यात जिवंत अळ्या, तसेच उंदीर आणि पालीच्या लेंड्या आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या विभागातील बहुतांश नागरिक आदिवासी समाजातील असून त्यांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शासन पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. काही वृद्ध आदिवासी महिलांनी रेशनिंगचे धान्य घरी नेल्यानंतर त्यामध्ये जिवंत अळ्या व घाण असल्याचे लक्षात आले. त्यांना दृष्टिदोष असल्याने हे धान्य शिजवून खाल्ले असते तर गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला असता. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि ऑल इंडिया पँथर सेनाचे रायगड जिल्हा प्रभारी नरेश गायकवाड यांनी हा प्रकार तहसीलदार आणि पुरवठा निरीक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलनही केले. या प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट अधिकारी आणि रेशनिंग दुकानदार एकमेकांना पाठीशी घालत आहेत. संबंधित दुकानदारांकडून फक्त ‘धान्य बदलून देऊ’ अशी औपचारिक आश्वासने दिली जात आहेत. पण अशी निकृष्ट दर्जाची धान्यवाटपाची पुनरावृत्ती वारंवार होत आहे, असा आरोप गायकवाड यांनी केला.
.................
प्रशासनाची भूमिका
या गंभीर विषयाबाबत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वीय सहाय्यक (एडीएसओ) दिपाली ब्राम्हणकर म्हणाल्या, शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, रेशन दुकानदारांनी निकृष्ट किंवा दूषित धान्य वितरित करू नये. अशा धान्याचा त्वरित परतावा करून नागरिकांना चांगल्या प्रतीचे धान्य देणे बंधनकारक आहे. संबंधित तहसीलदारांनी तातडीने चौकशी करून योग्य कारवाई करावी.
................
पालीतही तक्रारींचा पाढा
दरम्यान, पाली शहरातील काही रास्तभाव दुकानदारांविरोधातही अशाच स्वरूपाच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. वाघजाई नगर परिसरातील नागरिकांनी सप्टेंबर महिन्यात तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती की, त्यांना मिळणाऱ्या धान्यात जिवंत किडे, पाखरे आणि खडे आढळतात. रायगड जिल्ह्यातील या सलग घडामोडींमुळे गरीबांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या निकृष्ट धान्य वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने ठोस कारवाई करून दोषींवर शिक्षेची तरतूद न केल्यास नागरिकांचा संताप अधिक भडकण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com