युतीसाठी भाजप चालेल, पण शिवसेना नको!

युतीसाठी भाजप चालेल, पण शिवसेना नको!

Published on

युतीसाठी भाजप चालेल, पण शिंदे गट नको!
जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका; रायगड जिल्ह्यात राजकीय चर्चा तापल्या

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ६ : आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, युतीचे समीकरण ठरवताना स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद उफाळले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते भाजपसोबत तात्पुरत्या युतीसाठी तयार असल्याचे दिसत असले, तरी शिवसेना शिंदे गटासोबत हातमिळवणी करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदारांनी टोकाची भूमिका घेत राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे. जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर उघडपणे टीका केल्याने त्याचे पडसाद आता कार्यकर्त्यांवरही उमटू लागले आहेत. काही ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक गटांमध्ये झालेल्या फुटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे भाजपसोबत तांत्रिक युती करून निवडणूक लढवता येईल, पण शिवसेनेसोबत शक्य नाही, अशी भूमिका काही नेत्यांनी अंतर्गत बैठकींमध्ये मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचा विचार करून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य जिल्हा संघटनांना द्यावे, असे सांगितले. यामुळे रायगड जिल्ह्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार की युतीत, याबाबत आता चर्चेला अधिक वेग आला आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे-पाटील, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे जिल्हा व महापालिका पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार दळवींचा तटकरेंना थेट इशारा
कर्जत तालुक्यात नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाढती जवळीक दिसून आल्यानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. दळवी म्हणाले, की संवेदनशील मतदारसंघात सुनील तटकरे जर विरोधकांसोबत हातमिळवणी करीत असतील तर जशास तसे उत्तर दिले जाईल. त्यांनी थेट आरोप केला, की महायुतीत असताना मंत्रिपद भोगून विरोधकांसोबत युती करणे ही सुनील तटकरे यांची कायमची संस्कृती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रायगडची जनता याला योग्य उत्तर देईल, असा विश्वासही आमदार दळवी यांनी व्यक्त केला.

राजकीय समीकरणात उलथापालथ
पालकमंत्री पदावरून आधीच राष्ट्रवादी आणि शिंदे गटात तणाव निर्माण झाला होता. आता कार्यकर्त्यांच्या नाराजीसह आमदारांच्या थेट इशाऱ्यामुळे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. राज्य पातळीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युती टिकवण्याचा प्रयत्न करीत असले तरी रायगडसह संपूर्ण कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र मार्ग निवडू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com