दादा, भाऊ शेठ यांची समाजमाध्यमांवर गर्दी

दादा, भाऊ शेठ यांची समाजमाध्यमांवर गर्दी

Published on

दादा, भाऊ, शेठ यांची समाजमाध्यमांवर गर्दी
इच्छुक उमेदवारांना समाजमाध्यमांचा आधार
पाली, ता. ८ (वार्ताहर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत; मात्र असंख्य इच्छुक उमेदवारांनी यासाठी आतापासूनच कंबर कसली आहे. अनेकांनी थेट समाजमाध्यमांवर आपणच इच्छुक उमेदवार असल्याचे जाहीरदेखील केले आहे. शिवाय रोजच्या रोज यासंदर्भात आपल्या कामांच्या पोस्ट तसेच विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. समाजमाध्यमांवर अशा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी हे उमेदवार समाजमाध्यमांचा अतिशय प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत. या माध्यमातून ते आपली लोकप्रियता आणि जनतेच्या मनाचा कौलदेखील तपासत आहेत. शिवाय पक्षश्रेष्ठींपर्यंत आपल्या मनातील इच्छा या माध्यमातून पोहोचवली जात आहेत. काहींनी तर स्वतःला दादा, भाऊ, साहेब किंवा शेठ अशा उपाधीदेखील लावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पोस्टला विनोदी कमेंट्सदेखील पाहायला मिळतात. काही जण तर जाणूनबुजून कमेंटच्या माध्यमातून या उमेदवारांना हरभऱ्याच्या झाडावर चढवताना दिसतात. काही उमेदवारांनी तर आपल्यालाच तिकीट मिळणार, असे समाजमाध्यमांवर थेट जाहीरच करून टाकले आहे. तर काहींनी उमेदवारी न मिळाल्यास बंडाची भाषादेखील केली आहे. या इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते व चेलेचपाटेदेखील या पोस्ट विविध माध्यमांत शेअर करतात.

प्रतिस्पर्ध्यावर टीकास्त्र
संभाव्य प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीकास्त्र सोडण्यासाठी इच्छुक उमेदवार समाजमाध्यमांचा आधार घेत आहेत. तर काही जण समाजमाध्यमांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत आहेत. पुढील नियोजनासाठीदेखील उपयोग करताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवार व विविध पक्षांनी आपले कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे तात्पुरते व्हॉट्सॲप ग्रुप तयार केले आहेत. यावर सभा, भेटीगाठी, प्रचार इत्यादींवर चर्चा, नियोजन केले जाते. शिवाय आढावा घेणे व व्यूहरचना ठरवली जात आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष बैठक घेण्यापेक्षा हे अधिक प्रभावी ठरत आहे. शिवाय वेळ व खर्चदेखील वाचतो.

राजकीय विश्लेषण
फेसबुक, व्हॉट्सॲपवर सर्वत्र निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. यावर निवडणुकांची चर्चा रंगत आहे. कोणत्या उमेदवाराचे पारडे जड आणि कमी, कोण किती मते घेणार, कोणी किती विकासाची कामे केली याचे विश्लेषण सुरू आहे. याद्वारे उमेदवार व कार्यकर्ते आपल्या निवडून येण्याच्या व न येण्याच्या शक्यतांचा अंदाज बांधत आहेत. शिवाय आपल्यासोबत कोण कोण आहे किंवा नाही हेदेखील समजून घेत आहेत.

तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
निवडणुका गावखेड्यातील असल्या तरी प्रचारासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्वांकडूनच होताना दिसतो. इच्छुक उमेदवारांनी डिजिटल बॅनर व व्हिडिओ तयार केले आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. शिवाय पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखाही समाजमाध्यमांवर मांडला जात आहे.

मनोरंजन व वाद
सत्तेत असताना किंवा नसताना केलेली कामे, राबविलेल्या योजना व उपक्रम यांचे फोटो, व्हिडिओ व माहिती प्रसारित केली जात आहे. याशिवाय अनेक जण आपला अजेंडाही समाजमाध्यमांवर प्रसारित करीत आहेत. यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही उमेदवार व कार्यकर्ते समाजमाध्यमांद्वारे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार समोर आणत आहेत. या सगळ्यात सर्वसामान्य नागरिक व मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. काही वेळेला समाजमाध्यमांवरील वाद शिगेलाही जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com