महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर
विवेक सुभेकर अध्यक्ष, संदेश गायकवाड कार्यकारी अध्यक्ष; उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा गौरव
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि सामाजिक जागृती या उद्दिष्टांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) रायगड जिल्हा कार्यकारिणीची निवड बैठक रविवारी (ता. ९) नागोठणे येथील लायन्स ऑफिस, स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान येथे पार पडली. या बैठकीत जिल्हा पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या वेळी विवेक सुभेकर यांची जिल्हा अध्यक्ष, तर संदेश गायकवाड यांची जिल्हा कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा प्रधान सचिव म्हणून अमित निंबाळकर, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प कार्यवाह म्हणून मोहन भोईर, कायदेविषयक सल्लागार ॲड. संकल्प गायकवाड, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह नंदकिशोर राक्षे, तर महिला सहभाग कार्यवाह म्हणून योगिता डंगर यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत रायगड जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला. अमित निंबाळकर (उत्कृष्ट कार्यकर्ता), दिनेश शिर्के (लक्षवेधी कार्यकर्ता), प्रमोद खांडेकर (युवा कार्यकर्ता) आणि योगिता डंगर (उत्कृष्ट महिला कार्यकर्ती) यांना गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी महा. अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण देशमुख, राज्य सल्लागार समिती सदस्य भाऊ सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. गणेश चिंचोले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यपरंपरा स्पष्ट करताना, युवकांनी वैज्ञानिक व विवेकनिष्ठ विचारांचा स्वीकार करावा, तसेच मुलांना वाचन संस्कृतीकडे प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.

