पाली बसस्‍थानकाची दुरवस्‍था

पाली बसस्‍थानकाची दुरवस्‍था

Published on

पाली बसस्‍थानकाची दुरवस्‍था
आमदार हरून खान यांच्याकडून अधिवेशनात मुद्दा उपस्‍थित
पाली, ता. १५ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाली शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न गेल्या तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित आहे. एकीकडे काम ठप्प असून, दुसरीकडे स्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे; मात्र या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत मूग गिळून गप्प असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १४) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे वर्सोवाचे आमदार हरून खान यांनी पाली बसस्थानकाच्या दुरवस्थेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांचा प्रवास मोठ्या प्रमाणावर एसटी बससेवेवर अवलंबून असतो. तसेच पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने येथे तहसील, पंचायत समिती, पोलिस स्‍थानक, महाविद्यालये व इतर शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी व कर्मचारी विविध कामांसाठी दररोज पालीत ये-जा करतात; मात्र अशा महत्त्वाच्या ठिकाणचे बसस्थानक अक्षरशः दुरवस्थेचे प्रतीक बनले आहे. स्थानकातील निवारा शेडमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. स्वच्छतागृहे मोडकळीस आली असून त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. परिसरात राडारोडा साचला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. धुळीचे प्रचंड साम्राज्य पसरल्याने प्रवासी व भाविकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही समाधानकारक व्यवस्था नसल्याचे आमदार हरून खान यांनी अधिवेशनात स्पष्ट केले. भाविकांसह स्थानिक नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
.................
स्थानिक लोकप्रतिनिधींना विसर
विशेष म्हणजे, हा प्रश्न उपस्थित करणारे आमदार रायगड जिल्ह्यातील नसून मुंबईतील वर्सोवा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत. बाहेरील मतदारसंघातील आमदारांनी सुधागड तालुक्यातील मूलभूत सुविधांचा मुद्दा विधानसभेत मांडणे स्वागतार्ह असले, तरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी गेल्या अनेक वर्षांत या प्रश्नाकडे गांभीर्याने का पाहिले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. पालीसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात अद्याप मूलभूत सुविधा अपूर्ण असणे हे निश्चितच खेदजनक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
........................
नागरिकांत चर्चा
या पार्श्वभूमीवर पाली परिसरात नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली असून, स्थानिक नेते व लोकप्रतिनिधींनी आता तरी अधिक सक्रिय होऊन या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा सक्षम असणे ही प्राथमिक गरज असून, हिवाळी अधिवेशनात बाहेरील आमदारांनी आवाज उठवून दिलेली जाणीव स्थानिक नेतृत्वासाठी डोळे उघडणारी ठरेल, असे नागरिकांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com