जेएसएम महाविद्यालयाला विजेतेपद
जेएसएम महाविद्यालयाला विजेतेपद
चोंढी, ता. १७ (प्रतिनिधी) : कोकण विभागीय आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत जे. एस. एम. महाविद्यालय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून जे. एस. एम. महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक ०४ अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोकण विभागातील एकूण चार संघांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व उपप्राचार्य डॉ. प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. अंतिम सामन्यात जे. एस. एम. महाविद्यालयाने प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवले, तर गोगटे जोगळेकर महाविद्यालय संघाने उपविजेतेपद पटकावले.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतमभाई पाटील यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीचे प्रमुख समीर गाडगीळ यांच्यासह प्रथमेश पाटील, रितेश ठाकूर, श्रेयश पाटील व साहिल कांबळे यांनी सामन्यांचे पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांच्या हस्ते पार पडला.

