नागरी असुविधा पर्यटनाच्या मुळावर

नागरी असुविधा पर्यटनाच्या मुळावर

Published on

नागरी असुविधा पर्यटनाच्या मुळावर
स्‍थानिकांसह पर्यटकांची गैरसोय; रायगड जिल्ह्याच्या पर्यटनावर गंभीर परिणाम
पाली, ता. २७ (वार्ताहर) : उन्हाळी सुट्ट्या, दिवाळी, नाताळ व नववर्षाच्या कालावधीत पुणे-मुंबईसह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांची गर्दी जिल्ह्यातील पर्यटन, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे व ऐतिहासिक स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. विकेंडला फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. परिणामी पर्यटकांना तासन्‌तास रस्त्यावर खोळंबून राहावे लागत असून इच्छित स्थळी पोहोचण्यास मोठा विलंब होत आहे.
डोळ्यांचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य, तब्बल २४० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा, माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेला रायगड जिल्हा पर्यटनासाठी नंदनवन मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून पर्यटक, इतिहासप्रेमी, पर्यावरण अभ्यासक तसेच भाविक मोठ्या संख्येने रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात. नाताळच्या सुट्ट्या व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागांतील पर्यटकांची पावले जिल्ह्यातील समुद्रकिनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले व तीर्थक्षेत्रांकडे वळत आहेत. शाळा व महाविद्यालयांच्या सहलींसह विद्यार्थ्यांचा ओघही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती दिसून येते. मात्र, असे असतानाही मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी पर्यटक, भाविक व प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
माणगाव, इंदापूर, कोलाड व पुई या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांना तासन्‌तास अडकून राहावे लागते. जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासह काही अंतर्गत मार्गांची अवस्थाही अत्यंत खराब आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत सुरू असल्याने खड्डे, खाचखळगे, अरुंद रस्ते आणि अपूर्ण कामांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
..............
अढथळ्यांचा सामना
पनवेल, पेण, अलिबाग, खोपोली, पाली, माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा व रोहा या शहरांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. अलिबाग–नागाव, आक्षी, रेवस, वरसोली, मुरूड–काशिद, श्रीवर्धन–दिवेआगर, हरिहरेश्वर व आदगाव येथील समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत असले, तरी तेथील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने मोठी वाहने व खासगी वाहने एकाच वेळी मार्गक्रमण करताना अडथळे निर्माण होतात. परिणामी वारंवार वाहतूक कोंडी होत असून अनेक पर्यटकांचा हिरमोड होत आहे. माथेरानकडे जाणाऱ्या अरुंद व घाट रस्त्यांमुळेही वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.
...................
पर्यटकांची पाठ
पाली येथील बल्लाळेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून अंतर्गत मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तसेच वडखळ, पेण, रामवाडी, इंदापूर, कोलाड व लोणेरे आदी ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीला प्रवासी व पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नसल्याची खंत डोंबिवली येथील पर्यटक नरेश पडवळ यांनी व्यक्त केली आहे. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे अनेक पर्यटक रायगड जिल्ह्याकडे पाठ फिरवत असून काही पर्यटक सिंधुदुर्ग व रत्नागिरीसारख्या इतर पर्यटन जिल्ह्यांकडे वळत आहेत. परिणामी रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर गंभीर संकट ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com