वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन

Published on

वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
प्रशासकीय कार्यक्षमतेचा नवा अध्याय; विकासकामांमध्ये राखली जाणार गुणवत्ता
पाली, ता. ५ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीने प्रशासकीय गुणवत्ता व कार्यक्षमतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयएसओ व्यवस्थापन प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कालावधी सहभागातून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली असून, ग्रामीण प्रशासनात उत्कृष्ट सेवा देण्याच्या दिशेने ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.
सोमवारी (ता. ५) पाली येथे आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती सुधागडच्या गटविकास अधिकारी लता मोहिते व विस्तार अधिकारी आहिरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीस आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या मानांकनामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता, शिस्तबद्धता व नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. वऱ्हाड-जांभूळपाडा ग्रुप ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षात प्रशासन सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन प्रक्रिया सुलभ करणे तसेच नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात सेवा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला होता. जन्म-मृत्यू नोंदणी, कर आकारणी, प्रमाणपत्र वितरण, तक्रार निवारण यांसारख्या सेवा अधिक जलद व पारदर्शक करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्यात आले. याच प्रयत्नांना आयएसओ मानांकनाच्या माध्यमातून अधिकृत मान्यता मिळाली आहे. या यशामागे सरपंच पांडुरंग लिंबाजी शेंडे, उपसरपंच अरुणा गिरीश दळवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सचिन बालाजी केंद्रे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. टीमवर्क, नियोजनबद्ध कामकाज आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. आयएसओ मानांकनामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण मूलभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते देखभाल व दुरुस्ती यासह विविध विकासकामांमध्ये गुणवत्ता राखली जाणार आहे. तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार, जलद व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत अधिक सक्षम होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com