सकाळ इम्पॅक्ट : अंबा नदीतील वैद्यकीय कचराप्रकरणी प्रशासन सतर्क
सकाळ इम्पॅक्ट :
अंबा नदीतील वैद्यकीय कचराप्रकरणी प्रशासन सतर्क
पालीतील खासगी क्लिनिकची तपासणी, नोंदणी सक्तीची; नगरपंचायत व मेडिकल असोसिएशनची तातडीची बैठक
पाली, ता. ८ (वार्ताहर) : पाली येथील अंबा नदी पुलाजवळ थेट जैववैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासन अखेर खडबडून जागे झाले आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. ८) सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. परिणामी पाली नगरपंचायत आणि पाली मेडिकल असोसिएशन यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात आली असून, शहरातील सर्व खासगी क्लिनिकची तपासणी करण्याचा तसेच वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी नोंदणी सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाकण–पाली राज्य महामार्गावरील अंबा नदी पुलाजवळ वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शनच्या सुया, नळ्या, औषधांच्या काचा आणि इतर वैद्यकीय साहित्य मोठ्या प्रमाणावर उड्यावर टाकण्यात आले होते. हा कचरा एखाद्या रुग्णालय, खासगी दवाखाना किंवा वैद्यकीय कचरा संकलन करणाऱ्या एजन्सीकडूनच टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. उघड्यावर पडलेल्या या घातक कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून जनावरे, भटके कुत्रे यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय हा कचरा थेट अंबा नदीच्या संपर्कात आल्याने नदीचे प्रदूषण वाढणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पाली नगरपंचायत कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्ष पराग मेहता, उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर, नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडके, पाली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयंत जाधव तसेच असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत जैववैद्यकीय घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जैववैद्यकीय कचरा उचलण्याची जबाबदारी नगरपंचायतीची नाही. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांनुसार सर्व खासगी डॉक्टर, क्लिनिक आणि रुग्णालयांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी झाल्यानंतर अधिकृत एजन्सीकडूनच हा कचरा संकलित करून शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, या संदर्भात ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने दखल घेतली. पाली मेडिकल असोसिएशनच्या वतीने खुलासा करताना सांगण्यात आले की, यापूर्वी एमपीसीबीकडे नोंदणी करण्यात आली होती. मात्र संबंधित एजन्सीकडून वेळेवर कचरा उचलण्यासाठी वाहन न पाठविल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. या मुद्द्यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. नगराध्यक्ष पराग मेहता यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, या प्रकरणी त्यांनी स्वतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी चर्चा केली आहे. सर्व डॉक्टरांनी पुन्हा नोंदणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच नागोठणे, रोहा व आसपासच्या भागात कार्यरत असलेल्या अधिकृत एजन्सींची माहिती घेऊन मेडिकल असोसिएशनची स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
............
दोन दिवसांत क्लिनिक तपासणी
उपनगराध्यक्ष सुलतान बेनसेकर यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत नगरपंचायतीचे कर्मचारी पालीतील सर्व खासगी क्लिनिकला भेट देणार आहेत. या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील नोंदणीची छायांकित प्रत, डॉक्टरांची शैक्षणिक अर्हता व इतर अधिकृत कागदपत्रे तपासून नगरपंचायतीकडे जमा केली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

