शासकीय जागांवर उद्योजकांचा डोळा?
शासकीय जागांवर उद्योजकांचा डोळा?
सासवणे समुद्रकिनाऱ्यावरील जागेवरून वाद; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
अलिबाग, ता. १५ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या मोक्याच्या सरकारी जागांवर बड्या उद्योगपती आणि राजकीय शक्तींची नजर असून, कवडीमोल दरात या जागा बळकावण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे. असाच एक प्रकार अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात उघडकीस आला असून, समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी जागा एका उद्योजकाला देण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सासवणे गावातील समुद्रकिनाऱ्यालगत असलेली सुमारे ३३ गुंठे सरकारी पड जागा फळझाडे लावण्याच्या नावाखाली एका उद्योजकाला देण्याचा प्रस्ताव शासनाच्या महसूल व वन विभागाकडे सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ही संपूर्ण प्रक्रिया सासवणे ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून प्रशासकीय स्तरावर पुढे नेण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विविध विभागांनी पंचनामे करून आपले अभिप्राय सादर केले असले, तरी स्थानिक ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव किंवा संमती घेतली नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच गुरुवारी (ता. १५) मोठ्या संख्येने नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. सरपंच व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून, ही जागा उद्योजकाला दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला. सासवणे समुद्रकिनारी सध्या प्रति गुंठा ३० ते ४० लाख रुपये दराने जमिनीचे व्यवहार सुरू असताना, या २० गुंठे जागेचे मूल्यांकन अवघ्या ५९ लाख २५ हजार ६५१ रुपये इतके दाखवण्यात आल्याने संशय अधिक बळावला आहे. दरम्यान, या जागेचा वापर ग्रामस्थांच्या हितासाठी ओपन जिम, उद्यान व वृक्षलागवडीसाठी करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सासवणे मांडवा विभाग सहकारी मच्छीमार व्यावसायिक संस्थेनेही या प्रस्तावाला हरकत घेतली आहे.
.........................
प्रतिक्रिया
ही जागा शासकीय असून कोट्यवधी रुपयांची आहे. ती कवडीमोल दराने उद्योजकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न थांबविला पाहिजे. ग्रामस्थांच्या हितासाठी ही जागा ग्रामपंचायतीला मिळावी, यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ
- संतोष गावंड, सरपंच, सासवणे ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

