बीरवाडी व घोसाळेगड किल्ल्यांच्या कातळावर उलगडला हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सापडले १२० हून अधिक मंकला खेळपट

बीरवाडी व घोसाळेगड किल्ल्यांच्या कातळावर उलगडला हजार वर्षांपूर्वीचा इतिहास सापडले १२० हून अधिक मंकला खेळपट

Published on

कातळावर उलगडला हजार वर्षांपूर्वीचा इतिहास
बीरवाडी व घोसाळेगड किल्ल्यांवर सापडले १२० हून अधिक मंकला खेळपट
पाली, ता. ३१ (वार्ताहर) ः कोकणातील दुर्गवैभव केवळ त्यांच्या अभेद्य तटबंदीसाठीच नाही, तर तेथील समृद्ध सामाजिक जीवनासाठीही ओळखले जाते. याचाच एक पुरावा रोहा तालुक्यातील ऐतिहासिक बीरवाडीगड आणि घोसाळगड परिसरात तब्बल १२० हून अधिक प्राचीन मंकला खेळाचे पट शोधण्यात या संशोधकांना यश आले आहे.
मंकला हा खेळपट साधारणपणे इस ८०० ते ११०० या कालखंडातील म्हणजेच राष्ट्रकूट किंवा शिलाहार राजांच्या काळातील असल्याचा अंदाज रोशन म्हात्रे आणि सुजल पडवळ यांनी व्यक्त केला आहे. अंदाजे एक हजार ते ११२५ वर्षांपूर्वीचे हे ऐतिहासिक अवशेष त्या काळी किल्ल्यांवरील सैनिक आणि स्थानिक लोकांच्या विरंगुळ्याचे व बौद्धिक कौशल्याचे प्रमुख साधन होते.
नुकतेच बीरवाडीगड या गडाच्या दक्षिण पायथ्याला ५५ हून अधिक मंकला पट वन्यजीव अभ्यासक रोशन म्हात्रे आणि सुजल पडवळ यांच्या संशोधनातून समोर आले आहेत. हे पट प्रामुख्याने किल्ल्यावरील सपाट कातळावर कोरलेले आहेत, तर काही दिवसांपूर्वी घोसाळेगड परिसरात सुरुवातीला ५५ मंकला पट नोंदवले गेले होते. मात्र, अधिक सखोल संशोधनानंतर ही संख्या आता ६५ च्या पार गेली आहे. केवळ एका किल्ल्यावर मर्यादित न राहता, संपूर्ण रोहा परिसरात हा खेळ प्रचलित असल्याचे पुरावे या संशोधनातून समोर आले आहेत.

काय आहे मंकला खेळ?
मंकला हा जगातील सर्वात प्राचीन खेळांपैकी एक मानला जातो. आशिया आणि आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणावर खेळला जाणारा हा खेळ व्यापारमार्ग आणि सैनिकांच्या हालचालींमुळे भारतात पोहचला. दगडावर समोरासमोर कोरलेल्या खड्ड्यांमध्ये बिया किंवा खडे टाकून हा बुद्धीला चालना देणारा खेळ खेळला जातो.

जतन व संवर्धन गरजेचे
हे अवशेष केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते आपल्या पूर्वजांच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचे प्रतीक आहेत, असे मत रोशन म्हात्रे आणि सुजल पडवळ यांनी व्यक्त केले आहे. या शोधामुळे रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक महत्त्वात आणखी एक मोलाची भर पडली असून, दुर्गप्रेमींकडून या कार्याचे कौतुक होत आहे. या ऐतिहासिक ठेव्याचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com