वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट बागाईतदारांनी वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन

वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट बागाईतदारांनी वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन

Published on

वाढत्या उन्हामुळे आंबा फळगळीचे संकट
बागायतदारांना वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी तज्ज्ञांचे आवाहन
पाली, ता. १० (वार्ताहर) ः फेब्रुवारी महिना सुरू होताच वातावरणातील तापमानाचा पारा वाढू लागला आहे. याचा थेट फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लहान फळांची गळ सुरू झाली आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी हे नुकसान टाळण्यासाठी आतापासूनच तज्ज्ञांच्या सल्ल्याने बागेचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
आंब्याच्या एका मोहोराच्या दांडीवर ७५ ते ९५ टक्के नर फुले आणि ५ ते २५ टक्के द्विलिंगी फुले असतात. मोठ्या प्रमाणावर होणारी फळधारणा झाडाला पेलवत नाही. त्यामुळे नैसर्गिकरीत्या काही प्रमाणात फळगळ होतेच. मात्र याव्यतिरिक्त भुरी आणि करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव, तुडतुड्यांचा वाढता अटॅक आणि अन्नद्रव्यांची कमतरता यामुळे ही गळ अधिक तीव्र होते.
फेब्रुवारीपासून कोरडे आणि उष्ण वारे वाहू लागतात. यामुळे लहान फळांमधील ऑक्झी या संजीवकाचे प्रमाण कमी होते. परिणामी कोवळी फळे गळून पडतात. ज्या जमिनी हलक्या आहेत तिथे पाण्याचा ताण पडल्यास झाडावर नगण्य फळे शिल्लक राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. वेळेवर केलेली कीड आणि रोग नियंत्रण फवारणी आणि संजीवकांचा वापर यंदाच्या हंगामातील आंब्याचे उत्पादन शाबूत ठेवण्यास मदत करेल, असे मत पालीतील कृषितज्ज्ञ अमित निंबाळकर यांनी व्यक्त केले.

उत्पादन टिकवण्यासाठी हे करा उपाय
पाणी व्यवस्थापन : केवळ ठिबक सिंचनावर अवलंबून न राहता, बागेत गारवा टिकवण्यासाठी काही वेळा मोकळे पाणी सोडावे. यामुळे हवेतील आर्द्रता टिकून राहते.
आच्छादन ः जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी झाडाखाली उसाचे पाचट किंवा वाळलेल्या पालापाचोळ्याचा सहा इंची थर द्यावा. वाळवी रोखण्यासाठी त्यात लिंडेन पावडरचा वापर करावा.
हवारोधक झाडे : बागेच्या संरक्षणासाठी शेवरी किंवा रेनट्री यांसारख्या झाडांची लागवड करावी. यामुळे उष्ण वाऱ्यापासून बागेचे रक्षण होईल.
खतांचा वापर : नत्राचा दुसरा हप्ता आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा.

फोटो ओळ - पाली : आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com