आता ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी
आता ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी
२४० ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाच्या हाती; स्थानिक नेते पुन्हा सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १० : जिल्हा परिषदेच्या निवडणुका संपताच आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. वर्षभरात मुदत संपलेल्या तब्बल २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी तहसील कार्यालय स्तरावर सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोराने वाहण्यास सुरुवात होत आहे.
लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका मागे पडल्या होत्या. जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल २४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत. याची पायाभरणी नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निमित्ताने करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचारात ग्रामपंचायतींचा प्रचारही काही नेत्यांनी सुरू केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोषक वातावरण असल्याने या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी येथील इच्छुक लोकप्रतिनिधी करू लागले आहेत. प्रशासकीय स्तरावर या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. पुढील काही महिन्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांची निवडणूक लढविण्यासाठी लागणारे कागदपत्रे जमवण्याची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील काही आकाराने मोठ्या ग्रामपंचायतींचा यात समावेश असून, तेथील सरपंच पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
थेट सरपंचपदाचे आकर्षण
सरपंच पदाची निवडणूक थेट मतदारांमधून होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांनाही आमदारकीच्या निवडणुकीसारखे ग्लॅमर येत चालले आहेत. अलिबागमधील चेंढरे, थळ, पनवेल तालुक्यातील गव्हाण, पोयंजे, वावंजे, कर्जतमधील शेलू, कशेळे, नेरळ यांसारख्या ग्रामपंचायतींचा महसूल जिल्ह्यातील काही नगरपंचायतींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येथील सरपंचपदाची निवडणूक जिंकून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवण्याचा मोठ्या राजकीय व्यक्तींचा प्रयत्न असतो. त्यामुळे या ग्रामपंचायतींचा निवडणुका कार्यक्रम कधी जाहीर होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
प्रशासकांची कमतरता
दीड वर्षापूर्वी मुदत संपलेल्या या ग्रामपंचायती आहेत. तेव्हापासून या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाद्वारे हाकला जात आहे. एक प्रशासक दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार हाकत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत चालला आहे. याचा परिणाम ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामांवरही पडत असल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

