सुधागडचा नवा पॅटर्न सुधागडमध्ये ''उबाठा'' आणि ''शिंदे गट'' खांद्याला खांदा लावून लढले आणि जिंकले सुधागड सन्मान समितीच्या जोरावर प्रस्थापितांची सत्ता उलथवली
सुधागडचा नवा पॅटर्न
ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र लढले आणि जिंकले
पाली, ता. ११ (वार्ताहर) ः राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष टोकाला गेलेला असताना, सुधागड तालुक्याने मात्र एक नवा पॅटर्न समोर आणला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवत प्रस्थापितांच्या सत्तेला सुरुंग लावला. सुधागड सन्मान समितीच्या माध्यमातून केलेल्या या प्रयोगाने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
सुधागडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकतील, असा अंदाज होता. तिथे हे दोन्ही गट एकत्र लढले. या युतीमुळे शिंदे गटाच्या शर्मिला बोडके यांनी खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलिमा पाटील यांचा २,९३१ मतांनी पराभव केला. केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर पंचायत समितीमध्येही या युतीचा करिष्मा पाहायला मिळाला. परळी पंचायत समिती गणात ठाकरे गटाच्या प्रणिता परदेशी यांनी भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा २,५८८ मतांनी धुव्वा उडवला. प्रणिता परदेशी यांनी ५,६८३ मते घेत विजयाचा नवा विक्रम प्रस्थापित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सुधागड पॅटर्नची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
खासदारांच्या नेतृत्वासाठी धोक्याची घंटा
या निवडणुकीत भाजपने राबगाव गट आणि दोन गण राखण्यात यश मिळवले असले, तरी प्रतिष्ठेच्या जांभूळपाडा गटात झालेला पराभव धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वासाठी धोक्याची मानली जात आहे. सुधागड सन्मान समिती, दोन्ही शिवसेना, शेकापने दाखवलेल्या या ताकदीमुळे सत्ता समीकरणाचे गणित आता पूर्णपणे बदलणार आहे.
खिंडार पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख मिलिंद देशमुख आणि तालुकाप्रमुख रवींद्र देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सन्मान समितीला खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी नेत्यांच्या पक्षांतरापेक्षा सुधागडचा स्वाभिमान महत्त्वाचा मानत शर्मिला बोडके व प्रणिता राजेश परदेशी यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली.
फोटो ओळ,
पाली ः निकालानंतर शर्मिला बोडके व प्रणिता परदेशी तहसील कार्यालयातून बाहेर पडताना.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

