

‘मुंबई-गोवा’वर रसायनाच्या कंटेनरला अपघात
पाली, ता. १५ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावर मंगळवारी (ता. १५) पहाटे ५च्या सुमारास ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात झाला. जेएनपीएहून महाडच्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनरमध्ये ‘२-मिथाइल-२-प्रोपॅनॉल’ (टर्ट-ब्युटॅनॉल) हे अत्यंत ज्वलनशील रसायन होते. अपघातानंतर कंटेनरच्या मॅनहोलमधून रसायनाची गळती सुरू झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली; मात्र पोलिस आणि बचाव यंत्रणांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली. सकाळी ९च्या सुमारास कंटेनर सुरक्षितपणे हटविण्यात आला.
टर्ट-ब्युटॅनॉल हे अत्यंत संवेदनशील रसायन असून, ठिणगी किंवा अन्य कोणत्याही प्रज्वलनाच्या स्रोतामुळे त्याला आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे मोठा स्फोट होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच एसव्हीआरएसएस पथक, येरुणकर क्रेन सर्व्हिस, महामार्ग पोलिस केंद्राचे कर्मचारी, हायवे पोलिस आणि कोलाड पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने सुरक्षा कडे उभारून घटनास्थळ ‘नो मोबाईल झोन’ घोषित केले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने खांब ते कोलाड यादरम्यानची वाहतूक सुमारे एक तास पूर्णपणे थांबविण्यात आली. बचाव पथकाने सुरक्षिततेचे सर्व नियम पाळत ‘लिकेज कंट्रोल ऑपरेशन’ सुरू केले. मॅनहोलमधून होणारी रसायनाची गळती काळजीपूर्वक बंद करण्यात आली. त्यानंतर कंटेनर सुरक्षितपणे हटविण्यात आला. गणेशोत्सवातील प्रवाशांची मोठी वर्दळ असतानाही सर्व यंत्रणांच्या धाडसी आणि समन्वयपूर्ण कामामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.
----
फोटो ओळ : पाली : धोकादायक रसायनाचा कंटेनर सुरक्षितपणे हटविताना बचाव पथकातील सदस्य.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.