आरक्षणाला विरोध नाही मात्र आमच्या ताटातले घेऊ नका

आरक्षणाला विरोध नाही मात्र आमच्या ताटातले घेऊ नका

Published on

...पण आमच्या ताटातले घेऊ नका
पंकजा मुंडे यांचे परखड मत

सकाळ वृत्तसेवा
बीड, ता. २ : हा केवळ मेळावा नाही; तर ऊसतोड, कष्‍टकरी, संघर्ष करणाऱ्या माणसांच्या विचारांचा, श्रद्धेचा सोहळा आहे. येथे जमलेल्या प्रत्येकाने विचारांचा वासरा घेऊन जायचं आहे. मराठा आरक्षणाला दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचाही पाठिंबा होता, आपलाही आरक्षणाला विरोध नाही; पण आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका, असे परखड मत पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथील भगवान भक्तिगडावर गुरुवारी (ता. २) पार पडलेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. आमदार धनंजय मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा, महादेव जानकर, नारायण कुचे, मनीषा कायंदे, संजय केनेकर, मोनिका राजळे, लक्ष्मण हाके, आर्यमन पालवे, राधाताई सानप आदी उपस्थित होते. पंकजा म्हणाल्या, की पूरस्थितीत शेतकऱ्यांच्या वेदना पाहून लोक जातीपातीपलीकडे माणूस म्हणून मदतीला धावले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार पाठीशी ठामपणे उभे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने शब्द देत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचा वसा आणि वारसा कधीच सोडणार नाही, खाली मान घालायला लावणार नाही. सामान्यांचे हित जपण्याचे काम करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
...
खुर्चीसाठी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न!
आमदार धनंजय मुंडे म्हणाले, ‘‘२५० दिवस माझी वाईट मानसिकता होती. बहिणीने आधार दिला. पक्षाच्या, महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला. कोर्टाने मला क्लीन चिट दिली. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा आनंद आहे; पण काही लोक खुर्चीसाठी आरक्षणाच्या आड ओबीसीतून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात जातीय राजकारण वाढत असून, चांगले मित्र एकमेकांचे वैरी बनले आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील हे चित्र बदलण्याची जबाबदारी आपली आहे.’’ सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा विचार या मेळाव्यातून घ्यायचा असल्याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला.
...
कराडचा फोटो, घोषणाबाजी अन् मुंडेंचा संताप
मेळाव्याच्या ठिकाणी काही तरुणांच्या हाती वाल्मीक कराडचे फोटो होते. पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू झाल्यानंतर घोषणाबाजीमुळे पंकजा मुंडे संतापल्या. धिंगाणा करणारे लोक माझे असूच शकत नाहीत. तुम्ही माझ्या घोषणा दिल्याने माझे तुमच्याबद्दलचे मत बदलणार नाही. तुम्हाला कुणी सुपारी देऊन पाठविले, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. भाषणात त्यांनी भगवानगडाचा मेळावा माझ्याकडून हिरावून घेतला. आता हा मेळावाही हिरावून घेणार का, असा सवालही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com