
जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेत सक्रीय व्हा
खोपोली, ता. १९ (बातमीदार)ः केंद्रात २०२४ नंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार व राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भक्कम युती सरकार अस्तित्वात असेल. त्यामुळे ज्यांना मुख्य प्रवाहात येऊन जनतेची सेवा करायची आहे, त्यांनी अधिक वेळ न दवडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सक्रिय होण्याचे आवाहन श्रीरंग बारणे यांनी केले. खोपोलीतील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे सिद्ध झाले आहे. याच शिवसेनेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद असल्याने आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. हिंदुत्ववादी विचार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे आचरण यानुसार शिवसेना कार्यरत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले.
आगामी खोपोली पालिका निवडणूक व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक बहुमताने जिंकण्याचा निर्धार थोरवे यांनी व्यक्त करीत एकजुटीने कामाला लागण्याचा सल्ला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर प्रमुख संदीप पाटील यांनी केले. सूत्र संचालन शहर संपर्क प्रमुख तात्या रिठे यांनी तर आभार शहर समन्वयक राजू गायकवाड यांनी मानले.यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, उपाध्यक्ष भाई गायकर यांच्यासह कर्जत मतदारसंघ, खोपोली शहर, खालापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र
खोपोली शहरातील ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खोपोली शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र खासदार बारणे व आमदार थोरवे यांच्या हस्ते देण्यात आली. कर्जत मतदार संघ पक्ष प्रवक्ते म्हणून अमोल बांदल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
खोपोली :