जांबरुंग धरणासाठी एकवटले ग्रामस्‍थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांबरुंग धरणासाठी एकवटले ग्रामस्‍थ
जांबरुंग धरणासाठी एकवटले ग्रामस्‍थ

जांबरुंग धरणासाठी एकवटले ग्रामस्‍थ

sakal_logo
By

खोपोली, ता. १५ (बातमीदार) ः खालापूर तालुक्यातील नावंढे, केळवली, वांगणी, वणी, बीडखुर्द, जांबरुंग, खरवई, डोळवली आदी १५ गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, यासाठी जांबरुंग धरणाचा प्रस्‍ताव तयार करण्यात आला. मात्र फेब्रुवारी १९८० पासून हे काम रखडले आहे. तब्‍बल ४२ वर्षांनंतरही धरण न झाल्‍याने दरवर्षी उन्हाळ्यात परिसरातील गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर धरणाच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी मंजुरी व कार्यादेश पारित होण्यासाठी १५ गावातील नागरिकांनी एकत्रितपणे आमदार महेंद्र थोरवे यांना निवेदन दिले. जांबरुंग धरणाच्या निर्मितीने परिसरातील १८१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. १९८० मध्ये मंजूर झालेल्या धरणासाठी त्या वेळी ४९ लाख २० हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु योजना ४२ वर्षे रखडल्याने आता अतिरिक्त ६० कोटींहून खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीवर तब्बल ९० पटीने भार पडणार आहे. धरणाचे काम मार्गी न लागल्‍यास
शेतजमिनीसाठी पाणी व दैनंदिन पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होण्याची शक्‍यता आहे.
१९८० पासून राज्‍यात अनेक पक्षांच्या राजवटी आल्या, सर्वांनी मोठमोठी आश्वासने दिली. मात्र या रेल्वे पट्ट्यात पाण्याची समस्या अद्यापही जटील असून उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट ठरलेली आहे.

धरणाचे वैशिष्ट्ये
पाणीसाठा - २५६४.७१ घनमीटर
लांबी - ६१० मीटर
उंची - २८ मीटर

उजवा कालवा व डावा कालवा अशा दोन कालव्यातून जांबरुंग, उंबरवीरा, बिड्खुर्द, केळवली, वणी, खरवई आदी गावांना सिंचनाचा लाभ मिळेल. धरणासाठी १९.६९ हेक्टर वनजमिनीचे संपादन करण्यात आले आहे.

सरकारी दिरंगाईचा फटका
- जांबरुंग प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभानंतर १९९० मध्ये १३ लाख ९४ हजार रुपये खर्च करण्यात आल्याचे कागदोपत्री नमूद आहे. मात्र वनखात्याची वेळोवेळी अडवणूक व सरकारी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे धरण तब्बल ४२ वर्षे रखडल्याने परिसरातील पाण्याची समस्या तीव्र झाल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
-२००९ मध्ये वन खात्याला पर्यायी वनेत्तर जमीन उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात चिंचपूर येथे उपलब्ध करून देण्यात आली. त्‍यानंतर वनप्रस्ताव तयार करण्यासाठी १५ लाख ७८ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर नव्याने धरणासाठी निविदा काढून धरण व सिंचनासाठी १३ कोटी १७ लाखांची तरतूद करून काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

परिसरातील गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा, यासाठी जांबरुंग धरणाचे काम जलद गतीने होणे गरजेचे आहे. याकरिता आमदार महेंद्र थोरवेंना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे.
- संजय नाना देशमुख, नवघर ग्रामस्थ

जांबरुंग धरणाच्या निर्मितीतून परिसराला नवी संजीवनी प्राप्त होणार आहे. दैनंदिन गरजांसह शेतीला मुबलक पाणी मिळेल. सिंचन क्षेत्र वाढल्‍याने ग्रामस्‍थांचे उत्‍पन्नातही वाढ होईल. त्‍यामुळे धरणाचे काम लवकर सुरू व्हावे
- प्रशांत खांडेकर, जांबरुंग ग्रामस्थ

जांबरुंग धरण जलद गतीने पूर्णत्वास जाण्यासाठी योग्य दिशेने पाठपुरावा केला जात आहे. धरणाचे काम सुरू होऊन ते कार्यान्वित होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली असून लवकरच याचे सकारात्मक परिणाम दिसतील.
- महेंद्र थोरवे , आमदार कर्जत -खालापूर


खोपोली : आमदार थोरवे यांना ग्रामस्‍थांनी निवेदन दिले.