
पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीत भर
खोपोली, ता.२८ (बातमीदार) ः उन्हाळी सुट्यानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईसह परराज्यांतील पर्यटक मोठ्या संख्येने खोपोली, खालापूर व लोणावळा परिसरात दाखल झाले आहेत. येथील इमॅजिका, फार्महाऊस, वॉटरपार्क, कृषी पर्यटन केंद्रांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे द्रुतगती मार्ग, खोपोली-पेण रस्ता, खोपोली-पाली मार्गावर रविवारी सकाळपासूनच वाहनांची गर्दी होती. तर अनेक मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने चालकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
सर्वाधिक पर्यटक इमॅजिकाला येत असल्याने खोपोली-शीळफाटा ते इमॅजिकादरम्यान पाली फाटा, देवन्हावे रस्ता मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत आहे. या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी देवन्हावे गावचे माजी सरपंच अंकित साखरे, वरिष्ठ पदाधिकारी नितीन चौधरी यांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
खोपोली : शीळफाटा- पाली रस्ता ते इमॅजिकादरम्यान वाहतूक कोंडी होती.