खोपोलीतील वीजवितरण समस्या जटिल

खोपोलीतील वीजवितरण समस्या जटिल

Published on

खोपोली, ता. ७ (बातमीदार) ः निम्‍म्‍याहून अधिक मुंबईला २४ तास वीजपुरवठा करणारी टाटा वीजनिर्मिती कंपनी खोपोलीत पन्नास वर्षांपासून कार्यरत आहे, तरीही शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्‍याने नागरिकांतून रोष व्यक्‍त होत आहे. स्थानिक वीज वितरण प्रणालातील त्रुटी व कर्मचारी-अधिकाऱ्यांची मनमानीविरोधात खोपोलीत जनप्रक्षोभ व्यक्‍त होत आहे. दोन दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील वीजवितरण कार्यालयात धाव घेत, संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धरणे आंदोलन केले. मात्र तरीही कोणताही ठोस कार्यवाही होत नसल्‍याने आता शहरातील सर्वपक्षीय नेते एकवटले असून आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत आहेत.
माजी नगराध्यक्ष व वरिष्ठ नेते दत्ताजी मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच लोहाणा सभागृहात सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी बैठक झाली. बैठकीला वीजवितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती. सुरुवातीला खडाजंगी झालेल्या बैठकीत वीजवितरण अधिकाऱ्यांनी तांत्रिक बाबी स्पष्ट करून अधिकारी व कर्मचारी मार्ग काढीत असल्याचे सांगितले.
खोपोलीतील वीजवितरणमधील तांत्रिक त्रुटी, वारंवार होत असलेला खंडित वीजपुरवठा व त्या मागील कारणे, यंत्रणेत सतत होत असलेला बिघाड, कर्मचारी व अधिकाऱ्यांची भूमिका तसेच शहरासाठी असलेल्या प्रस्तावित व सद्यःस्थितीत रखडलेली भुयारी वीजवाहिन्या व जोडणी यंत्रणा प्रकल्प या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे व त्यावरील उपायांबाबत माहिती दिली. मसुरकर यांनी, प्रस्तावित भुयारी वीजवितरण व जोडणी प्रकल्प का व कशामुळे रखडला, याबाबत प्रश्‍न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी माजी नगरसेवक मोहन औसरमल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख, आपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष मनेष यादव, शिंदे गट शहर प्रमुख संदीप पाटील, शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल पाटील, शेकापचे कैलास गायकवाड, रवींद्र रोकडे, वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष दीपक गायकवाड, भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर आदी उपस्थित होते.

यंत्रणेत आधुनिकीकरणाची गरज
खोपोली वीजवितरण यंत्रणेत तांत्रिक बदल व आधुनिकीकरण होण्यासाठी तज्‍ज्ञ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी तसेच आवश्यक बदलांसाठी यंत्रसामग्री, त्यासाठी लागणारा निधी व मंजूर करण्यात यावा. त्‍यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्‍यावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. वीज वसुलीत खोपोली शहर पहिल्‍या क्रमांकावर आहे. तसेच टाटा कंपनीचा वीज प्रकल्‍पही खोपोलीत असूनही खंडित वीजपुरवठ्यामुळे स्‍थानिक नागरिक बेहाल झाले आहेत.

३० जुलैपर्यंत निर्णय घेण्याचा इशारा
खोपोलीतील भूमिगत वीजवाहिन्यांसाठी १५३ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी सर्वपक्षीय नेते मदत करू, असे आश्वासन माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांनी देत ३० जुलैपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले नाही तर मात्र गंभीर निर्णय घेऊ, असा इशाराही मसुरकर व माजी नगराध्यक्ष सुनील पाटील यांनी दिला.

खोपोली : विजवितरण अधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली.

.................

रेवदंडा (बातमीदार) : विजेच्या लपंडावामुळे रेवदंड्यातील नागरिक त्रस्‍त असून स्थानिक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी वीजवितरण कार्यालयात नुकतीच भेट घेत समस्यांचा पाढा वाचला. कार्यकारी अभियंता शैलेशकुमार सिंग, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रेय सांगले (अलिबाग विभाग) यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत अपुऱ्या मनुष्‍यबळाची अडचण सांगितले.
सद्या शैक्षणिक प्रवेश घेण्याचे काम सुरू आहे. शेतकरी वर्ग सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्नात आहेत. त्‍यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू असून विविध दाखले, महा-ई सेवा केंद्रात, तलाठी कार्यालयात जावे लागते, त्या दाखल्यांच्या झेरॉक्स काढाव्या लागतात परंतु वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्‍याने नागरिकांची गैरसोय होते.

रेवदंडा परिसरातील अनेक डीपी खुल्‍या आहेत. वीज खांब गंजले असून मोडकळीस आले आहेत. विद्युत वाहिन्याही जीर्ण झाल्‍या असून लोंबकळत असल्‍याने अपघाताची शक्‍यता आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्‍याने उपहारगृहे, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, हॉटेल, इस्‍त्री व्यावसायिक सर्वांनाच फटका बसतो. काही भागात वीजपुरवठा कमी-जास्‍त होत असल्‍याने घरातील विजेची उपकरणे नादुरुस्‍त झाल्‍याच्या घटनाही घडल्‍या आहेत. याठिकाणी नवीन विद्युत रोहित्रयंत्र बसवण्याची मागणी नागरिकांनी महावितरणकडे केली आहे.
दोन महिन्यांपासून देयके वेळेत मिळत नसल्‍याने ग्राहकांना नाहक विलंब शुल्‍क भरावे लागते. थेरोंडा, रेवदंडा या दोन्ही भागात मिळून सुमारे पाच हजार वीजग्राहक आहेत, त्‍यामुळे विजेची समस्‍या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी कनिष्ठ अभियंता तेजस खाले यांनी दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करण्यात येतील, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.