दरडप्रवण क्षेत्रात सावधगिरीचा इशारा

दरडप्रवण क्षेत्रात सावधगिरीचा इशारा

Published on

खोपोली, ता. ९ (बातमीदार) ः गतवर्षी इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेनंतर प्रशासकीय स्तरावर दरडप्रवण क्षेत्रातील रहिवासीचे नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. खोपोली नगरपालिका क्षेत्रात एकूण तीन रहिवासी भाग दरडप्रवण व अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दोन दिवस सुरू
असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्‍या अतिवृष्‍टीच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांना खोपोली नगर पालिका प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
खोपोली नगर पालिका क्षेत्रात काजूवाडी, सुभाषनगर व यशवंत नगरचा काही भाग दरडप्रवण व धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. या तीनही वस्तीत जवळपास ८०० रहिवासी घरे असून साधारण ३००० ते ३२०० च्या आसपास लोकवस्ती आहे. या परिसरातील काही घरे अतिशय धोकादायक असून त्‍यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. पुढील दोन-तीन दिवस रायगड जिल्ह्यासह खोपोली परिसरात मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर दरडग्रस्त भागातील रहिवाशांना जागृत करण्यात येत असून दरड साक्षरता निर्माण होण्यासाठी मोहीम सुरू आहे.
मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अभियंता व नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांनी तीनही रहिवासी भागांचा आढावा घेतला. तसेच २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची निर्मिती केली असून विशेष पथकही तैनात ठेवण्यात आले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुप अशा संस्थाही कोणत्याही आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी अलर्ट आहेत.

नागरिकांच्या स्‍थलांतराची व्यवस्‍था
अतिवृष्टीमुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशा घरांतील रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबत मोहीम राबवण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही, अशांना जवळ नगर पालिकेची शाळा किंवा सामाजिक सभागृहात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरील जमीन ठिसूळ होते. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता दरडग्रस्त व धोकादायक वस्तीतील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याची व सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्‍या आहेत.
- डॉ पंकज पाटील पाटील, मुख्याधिकारी, खोपोली

खोपोली : नगरपालिका क्षेत्रातील सुभाष नगर व काजूवाडीचा दरडप्रवण क्षेत्रात समावेश असल्‍याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

............

लोकलचे वेळापत्रक विस्‍कळित
खोपोली, ता. ९ (बातमीदार) ः दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्‍या संततधारेमुळे पाताळगंगा नदी, उपनाल्यांची पातळी वाढली आहे. सोमवारी मुंबई महानगर व ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकल गाड्या, रेल्वे रद्द किंवा विस्कळित झाल्याने त्‍याचा फटका खोपोलीतील प्रवाशांना बसला. हवामान विभागाने वर्तवलेल्‍या अंदाजानुसार, खबरदारी म्हणून मंगळवारी खोपोली शहर व खालापूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुटी जाहीर करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.