

अंबा बैसली सिंहासनी हो..!
शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात देवींची १,१४३ सार्वजनिक मंडळांमध्ये आणि १९४ घरगुती ठिकाणी गुरुवारी (ता. ३) प्रतिष्ठापना होणार आहे. ऊर्जेचे प्रतीक असलेल्या या उत्सवानिमित्त जिल्ह्यात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात शारदीय नवरात्रोत्सवाची परंपरा आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा सार्वजनिक मंडळांसाठी राजकीय नेत्यांनी सढळ हाताने मदत केली आहे, त्यामुळे उत्सवावर निवडणुकीची छाप दिसते आहे.
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. या काळात नऊ दिवस देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा-अर्चा केली जाते. घटस्थापनेसाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे किंवा मडके, सात प्रकारची धान्ये, लहान मातीचा किंवा पितळी कलश, गंगाजल, मौली धागा, अत्तर, सुपारी, कलशात ठेवण्यासाठी नाणे, आंब्याची पाच पाने, अक्षता, नारळ, लाल कापड, झेंडूची फुले आणि दुर्वा आवश्यक असतात. प्रत्येक समाजात नवरात्रोत्सव हा धार्मिक विधींना धरूनच साजरा केला जातो. रात्री जागरण, गरबा, रास दांडिया खेळला जातो.
घटस्थापनेचा मुहूर्त
आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवार, ४ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजून ५८ मिनिटांनी समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह दुर्गा मातेला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना मुहूर्त गुरुवारी सकाळी सहा वाजून १५ मिनिटांपासून ते सात वाजून २२ मिनिटांपर्यंत असेल. तर, अभिजात मुहूर्त सकाळी ११ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत असेल.
घटस्थापना कशी करावी?
नवरात्रीच्या काळात मातीच्या मडक्यात धान्य पेरण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे, जी आजही लोक पाळतात. घटस्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावी. त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षता आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर आंब्याची किंवा अशोकाची पाच पाने ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा. पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा. याशिवाय देवी किंवा घटासमोर जो दिवा लावला जातो, त्याला नंदादीप बोलले जाते. हा नंदादीप नऊ दिवस तेवत ठेवला जातो.
अंकुरीत धान्यामागील पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, ब्रह्मदेवाने जेव्हा या विश्वाची स्थापना केली, तेव्हा वनस्पतींमध्ये उगवलेले पहिले पीक ‘जव’ होते. या कारणास्तव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसह संपूर्ण विधीपूर्वक जवाची पेरणी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जव हे ब्रह्मदेवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे घटस्थापनेच्या वेळी नवरात्रात प्रथम जवाची पूजा केली जाते.
नऊ माळांची प्रथा
काही समाजात प्रत्येक दिवशी झेंडूच्या फुलांची माळ बांधण्यात येते; तर काही समाजात प्रथेनुसार नागवेलीची पाने किंवा पिठापासून बनवलेल्या कडकनीची माळ बांधली जाते.
परडीची पारंपरिक पूजा
देवीच्या परडीचीदेखील विधिवत पूजा केली जाते. त्यानंतर ज्याच्या कुटुंबातील सदस्याकडे परडी असेल त्याला नऊ दिवस घरोघरी जाऊन देवीच्या नावाने जोगवा मागावा लागतो. दररोज पाच ते सात घरे दररोज जोगवा मागावा लागतो. त्यानंतर नवमी किंवा दशमीच्या दिवशी सुवासिनींना घरी बोलावून त्यांच्या परड्या भरल्या जातात. त्यात कोरडे धान्य, पीठ व पुरणपोळी ठेवून पूजा करतात. सोलापूर, कर्नाटकमधील काही समाजात मटण बनवून तेदेखील परडीत ठेवले जाते. विशेष म्हणजे, जोगव्यात आलेले धान्य किंवा पैसे ते घरी खर्च न करता, जी कुलदेवी असेल तिथे जाऊन पुन्हा परड्या भरल्या जातात. त्यानंतर पुन्हा घरी येऊन परड्या भरल्या जातात. ही विधी आजही शहरी भागात केला जातो.
देवीची रूपे
पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री.
.........
नियमांचे पालन करून नवरात्रोत्सव साजरा करा
खोपोली, ता. २ (बातमीदार) ः शहरातील सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच खोपोली पोलिस ठाण्यात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उत्सव साजरा करताना, आवश्यक सर्व परवाने घ्या, मुली व महिलांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी खास काळजी घ्या, प्रशासनाने निश्चित केलेल्या अटी-शर्ती व नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.
खोपोलीची ओळख शांत व संयमी, सांस्कृतिक वैभव प्राप्त असलेले शहर अशी आहे, ही ओळख जपण्यासाठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे. नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा जागर केला जातो. देवी, घटस्थापना असलेल्या मंडपाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना, सीसीटीव्ही कॅमेरे, वेळ व आवाजाची मर्यादा, महिला व मुलींची सुरक्षा, कोणत्याही प्रकारे तेढ किंवा वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांनी केल्या. देवी किंवा घट विसर्जन मिरवणुका निर्धारित वेळेत व सुरक्षित संपन्न होतील, याची काळजी मंडळ पदाधिकारी व सदस्यांनी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
.................
सजावटीची दुकाने सजली
रेवदंडा, ता. २ (बातमीदार) : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. घराघरांत घटस्थापनेची तयारी सुरू असून देवीच्या मूर्ती, पूजा साहित्य, नारळ, फळ-फुलांच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. देवीच्या मंदिरात स्वच्छता, मंडप सजावट, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाजारात शेवंती, झेंडूसह चाफा, अस्टर या फुलांना मागणी आहे. काही वर्षांपासून गरबा, रास-दांडियाची क्रेझ वाढली असून विविध प्रकारच्या दांडिया बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.