गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू

Published on

गणपतीपुळे समुद्रात बुडून
मुंबईतील तरुणाचा मृत्यू

दोघांना वाचविण्यात यश; महाविद्यालयीन विद्यार्थी

रत्नागिरी, ता. ७ ः गणपतीपुळे येथील समुद्रात मुंबईतील तिघे तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर दोघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. आज शुक्रवार (ता. ७) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी (वय २६ , रा. मानखुर्द, मुंबई) असे मृताचे नाव आहे; तर भीमराज आगाळे (२४, रा. कल्याण, मुंबई) आणि विवेक शेलार (२५, रा. विद्याविहार, मुंबई) या दोघांना वाचविण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यवसायिक, जीवरक्षक, पोलिस व ग्रामस्थ यांना यश आले. याबाबत अधिक माहिती अशी, की मुंबई येथून आदर्श धनगर (रा. गोवंडी, मुंबई), प्रफुल्ल त्रिमुखी, सिद्धेश काजवे (रा. परेल- लालबाग), भीमराज आगाळे, विवेक शेलार असे महाविद्यालयातील मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन व पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले. ते एका खासगी लॉजमध्ये निवासासाठी उतरले होते. दुपारनंतर ते समुद्रात उतरले. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचे समुद्रस्नान सुरूच होते. त्यातील प्रफुल्ल त्रिमुखी, भीमराज आगाळे आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागले. या वेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यावर समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मोरया वॉटर स्पोर्ट व्यावसायिक व जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिन्ही तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले. त्यांना तत्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. प्रफुल्ल त्रिमुखी हा मृत झाल्याचे घोषित केले; तर भीमराज आगाळे आणि विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार करून शुद्धीवर आल्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. मृत प्रफुल्ल त्रिमुखी याचे शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी सांगितले. त्‍याच्या कुटुंबीयांना या घटनेबाबत कळविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com