

‘गोकुळ’वर अखेर महायुतीची सत्ता
राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत अखेर शासन नियुक्त संचालकांच्या मतांवर मंगळवारी महायुतीचा अध्यक्ष झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील यांचा १६ विरुद्ध १३ अशा मतांनी विजय झाला. यामधील चार शासन नियुक्त संचालकांची मते पाटील यांना मिळाल्यामुळे समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयकेर यांचा चार मतांनी पराभव झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार मोजणी झाल्यानंतर शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र पेटीत ठेवण्यात आली.
गोकुळच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सुरू झालेला राजकीय संघर्ष अखेर अध्यक्ष निवडीच्या रणांगणातही कायम राहिला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात मंगळवारी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रिया सुरू झाली, ती दुपारी अडीचपर्यंत सुरू राहिली. या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत दूध उत्पादक ठरावधारक मतदारांनी समविचारी आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून दिले. गोकुळच्या उपविधीनुसार अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक १४ संचालकांची उपस्थिती (कोरम) असते; मात्र या सभेला महायुतीचे सर्व १२ संचालक अनुपस्थित राहिले होते.
पहिली सभा कोरमअभावी तहकूब झाली होती. त्यामुळे निवड प्रक्रियेत पेच निर्माण झाला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी दुसऱ्यांदा अध्यक्ष निवड सभेत मतदान झाले. शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीचे गणित बदलले. त्यांची चार मते महायुतीच्या पारड्यात गेल्यामुळे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील विजयी झाले.
...
... म्हणून निर्णायक वळण
न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशानुसार शासन नियुक्त संचालकांची मते स्वतंत्र ठेवण्यात आली. औरंगाबाद खंडपीठात सोमवारी (ता. ९) झालेल्या सुनावणीत शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यासंबंधीच्या याचिकेला स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे हे संचालक मंगळवारी पोलिस बंदोबस्तात मतदानासाठी उपस्थित राहिले. त्यांच्या मतदानामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला निर्णायक वळण मिळाल्याचे दिसून आले.
...
अशी झाली निवड...
दुपारी दोन वाजता मतमोजणी सुरू झाली. यामध्ये पहिल्या टप्प्यात निवडून आलेल्या २५ संचालकांची मतमोजणी झाली. समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना १३, तर महायुतीचे राजेश पाटील यांना १२ मते मिळाली. पुढील दुसऱ्या टप्प्यातील मोजणीत शासन नियुक्त संचालकांच्या मताची मोजणी झाली. त्यामध्ये महायुतीचे राजेश पाटील यांना चार मते मिळाल्याने ते गोकुळच्या अध्यक्षपदी विराजमान झाले.
...
आक्षेप घेतला, पण...
समविचारी आघाडीचे संचालक अभिजित तायशेटे, बयाजी शेळके आणि प्रा. किसन चौगले यांनी चार शासननियुक्त संचालकांच्या उपस्थितीवर आक्षेप नोंदविला. गोकुळच्या उपविधीनुसार सात दिवसांची नोटीस शासननियुक्त संचालकांना देण्यात आली आहे काय, असा मुद्दा उपस्थित केला. याला तांत्रिक उत्तर देऊन निवडणूक प्रक्रिया पुढे कायम ठेवण्यात आली. हा आक्षेप नोंदविल्याची माहिती प्रशासनाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नोंदविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.